Breaking News | स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक

पुणे (अब्बास शेख) : पुणे च नव्हे तर संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुमारे १३ पोलीस पथके या आरोपीचा शोध घेत होती. हा आरोपी शिरूर येथील गुनाट या गावाच्या आसपास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मोठी शोध मोहीम राबवत अखेर आरोपीला रात्री उशिरा शिताफिने जेरबंद केले आहे.

पुण्यातून फलटणकडे निघालेल्या तरुणीवर स्वारगेट येथे उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये आरोपीने बलात्कार केला होता. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ५:३० च्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. पोलिसांनी सिसिटीव्ही फुटेज मिळवत यातील आरोपीचे नाव निष्पन्न करून असून त्याचा शोध घेण्यासाठी १३ पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती.

पीडित तरुणीवर बलात्कार करून आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा फरार झाला होता. या घटनेतील पीडित मुलगी पुण्यात काम करत असून ती फलटण या ठिकाणी तिच्या गावी निघाली होती. सकाळच्या सुमारास ती बसची वाट बघत असताना आरोपी गाडे हा तिच्याकडे गेला आणि तिच्याशी बोलू लागला. आरोपीने तिच्याशी गोड बोलून ओळख करुन घेतली आणि कुठे जाणार आहे आहे असे विचारून तिला फलटणला जायचे आहे ही माहिती तिच्याकडून काढून घेतली आणि फलटणकडे जाणारी बस इथे नाही तर दुसऱ्या ठिकाणी लागते असे म्हणून तिला शिवशाही बसजवळ घेऊन गेला आणि बसमध्ये तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर दोनवेळा बलात्कार केला.

पुणे पोलिसांनी मोठी शोध मोहीम राबवत या आरोपीला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले होते. अखेर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.