दौंड मध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी, हिंदू बांधवांकडून मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा

दौंड : मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरी केली. ईदच्या नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मिरवणुकीने( जुलूस) येथील ईदगाह मैदानावर आले. जुलूस मध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होते. 

जामा मशिदीचे मौलाना मुबीन आतार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. यावेळी मौलानांनी संपूर्ण देशामध्ये भाईचारा व शांतता नांदावी म्हणून अल्लाह कडे प्रार्थना केली. अल्लाह भारत देशाचे सतत रक्षण कर, संपूर्ण देशामध्ये भाईचारा व जातीय सलोखा अबाधित ठेव, जे अडचणीत आहेत, आजाराने त्रस्त आहेत अशांना तू सर्व त्रासातून मुक्त कर अशी प्रार्थना मौलाना यांनी यावेळी केली.

आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, इंद्रजीत जगदाळे, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार,दौंड नगरपालिकेचे विजय कावळे तसेच येथील राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांनी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची भेट घेत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.