अख्तर काझी
दौंड : दौंड शहरात मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील मुख्य चौकांमध्ये पाण्याचे तळे साठुन परिसरातील व्यापाऱ्यांच्या थेट दुकानात, गोदामात पाणी शिरल्याने त्यांच्या मालाचे मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसला असल्याचे चित्र समोर येत आहे. याला सर्वस्वी नगरपालिकेचा गलथान कारभार असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून होत आहे.
शहरातून गेलेल्या अष्टविनायक मार्ग रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, परंतु येथील शिवाजी चौक परिसरात काही ठिकाणी ते अर्धवट अवस्थेत आहे. या मार्गावरील रस्त्याला लागून असलेल्या ड्रेनेजचे कामही त्यामुळे रेंगाळले आहे. मोठा पाऊस झाल्यानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी लागणारी कोणतीच सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यातच अष्टविनायक मार्ग रस्ता येथील जोड रस्त्या पेक्षा खूपच उंच झाल्याने या ठिकाणी पाणी पूर्णतः अडून या ठिकाणाला पाण्याच्या तलावाचे स्वरूप येत आहे व हेच साचलेले पाणी परिसरातील दुकानांमध्ये, इमारतींच्या तळघरातील मालाच्या गोदामांमध्ये शिरत असून परिणामी येथील मालाचे प्रचंड नुकसान होऊन व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
या सर्व परिस्थितीला सर्वस्वी नगरपालिका व त्यांचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप व्यापारी संजय पगारिया यांनी केला आहे. नगरपालिकेने यावर ठोस उपाय योजना करून व्यापाऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी या परिसरातील व्यापारी करीत आहेत.