दौंड : रेल्वे रुळांवर दगड ठेवून घातपात करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना दौंड लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचत मोठ्या शिताफिने अटक केली आहे. हे सराईत गुन्हेगार आरोपी तब्बल 26 वर्ष पोलिसांना गुंगारा देत होते, परंतु अखेर दौंड लोहमार्ग पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा शोधित त्यांच्या मुस्क्या आवळल्या.
पिट्या उच्चानाना काळे (वय 45,रा. राक्षस वाडी,ता. कर्जत,जि. नगर), सुभाष बनात पवार (वय 55,रा. लोणी देवकर, ता. इंदापूर ,जिल्हा पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी पिट्या काळे याला कर्जत तालुक्यातील वारघड वस्ती येथून अटक करण्यात आली तर सुभाष पवार या आरोपीला इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथून अटक करण्यात आली. आज दि. 15 सप्टेंबर रोजी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दिनांक 2 मे 1997 रोजी उरळी कांचन ते यवत स्टेशन दरम्यान रुळावर दगड ठेवून चेन्नई एक्सप्रेस गाडीच्या इंजिनच्या कॅटलगार्डचे नुकसान करून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केला होता. त्यामुळे सदर आरोपींच्या विरोधात भारतीय रेल्वे कायदा कलम 150 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दिवसापासून गेली 26 वर्ष आरोपी फरारच होते. दरम्यान लोहमार्ग पोलिसांना खबरीमार्फत आरोपींचा ठावठिकाणा लागला. परंतु आरोपींना विशिष्ट तांड्यातून अटक करावयाची असल्याने व पोलीस पथक साध्या वेशामध्ये असल्याने त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलीस पथकाने आरोपींना संशय येऊ न देता एक विशेष योजना आखून त्या तांड्यातून त्यांना शिताफिने अटक केली. लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाडसी कारवाई पार पाडणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
सदरची कारवाई पो. अधीक्षक (लोहमार्ग, पुणे) तुषार दोशी, अप्पर पो. अधीक्षक रोहिदास पवार तसेच उपविभागीय पो. अधिकारी महेश देवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड चे पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड व पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार आनंद वाघमारे, धनंजय वीर, पोलीस अंमलदार नरेंद्र पवार तसेच सर्वेलन्स ( तपास) पथकाचे पो. हवा. मनोज साळवे यांच्या पथकाने केली आहे.