सुधीर गोखले
सांगली : जिल्ह्यातील मिरज आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा एक महत्वाचा रस्ता म्हणजे मिरज कृष्णाघाट रस्ता. या रस्त्यावर असलेल्या रेल्वे फाटकामुळे दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांची खूप अडचण होत होती. गेल्या २० वर्षा पासून मिरजकर नागरिकांनीही याठिकाणी उड्डाणपूल होण्यासाठी सतत आंदोलनेहि केली होती आज प्रत्यक्ष मिरजकरांच्या या मागणीला यश आले.
बहुचर्चित असा हा उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला झाला असून यामुळे मिरजेसह कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड, शिरोळ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, कुरुंदवाड, आलास अशा गावातील संपर्क विना अडथळा प्रस्थापित झाला आहे. मिरज येथून या रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची ये जा असते. येथील असणाऱ्या रेल्वे फाटकामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत होती कित्तेक अपघातही इथे घडले आहेत तर अनेक गर्भवती स्त्रियांना या गैरसोयीचा फटका बसला आहे.
काल उशिरा या रेल्वे उड्डाणपुलाचे उदघाटन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथून ऑनलाईन पद्धतीने झाले. या उदघाटनांनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी प्रत्यक्ष कृष्णाघाट रस्त्यावर या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. यावेळी सुशांत खाडे, भाजप अनु जाती मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस आणि मिरज विधासनभा प्रमुख प्रा मोहन वनखंडे, महारेल चे व्यवस्थापक मुदस्सर भट कौलगुड कन्स्ट्रक्शन चे चैतन्य कौलगुड, वैभव कौलगुड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री खाडे म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून या रेल्वे उड्डाणपुलाची मागणी नागरिकांमधून होत होती प्रथम या ठिकाणी रेल्वे भुयारी मार्गाचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर केला गेला मात्र या रस्त्यावरील वाहतूक आणि महापुराचे पाणी पहाता उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली आणि हि मागणी मी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली तातडीने ३३ कोटींचा निधीही मंजूर करून घेतला त्याप्रमाणे या पुलाचे कंत्राटदार कौलगुड कंपनीने या पुलाची जलद गतीने निर्मितीही केली आहे त्यामुळे मिरजेच्या वैभवात नक्कीच भर पडली आहे त्यांचेही याठिकाणी अभिनंदन मी करतो. आज या पुलामुळे दोन जिल्हे चांगल्या पद्धतीने जोडले गेले असून आता रेल्वे फाटकाचा त्रास कायम स्वरूपी निकाली लागला आहे.
आता असाच एक पूल मिरज बेडग रस्त्यावर उभारायचा सुमारे ४० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. तो हि अंतिम टप्प्यात असून मिरज बेडग रस्त्यावरील वाहतूक त्यामुळे जलद गतीने होईल असेही ते म्हणाले. यावेळी माजी महापौर संगीता खोत, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर वनखंडे, जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, गजेंद्र कुल्लोळी, पांडुरंग कोरे आदी उपस्थित होते.