दौंड (अब्बास शेख) : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. उद्या २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून या निवडणूक निकालाबाबत कुल आणि थोरात समर्थकांनी विजय आपलाच होईल असा दावा केला आहे.
विजयाची दिली जाणारी कारणे – कुल समर्थक विजयाचा दावा करताना, आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यात केलेली विकासकामे, कोरोना काळात नागरिकांना करण्यात आलेली अनमोल मदत, भीमा पाटस कारखाना सुरु झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झालेला फायदा, आरोग्यनिधीच्या माध्यमातून नागरिकांना झालेली मदत यामुळे तालुक्यातील जनता राहुल कुल यांना तिसऱ्यांदा निवडून देईल आणि त्यांची हॅट्रिक होईल असा विश्वास व्यक्त करत आहेत.
तर माजी आमदार रमेश थोरात यांचे समर्थक राज्यात तुतारीची असलेली हवा, दौंड तालुक्यात लोकसभेला तुतारीला झालेले मतदान आणि विशिष्ट समाजांचा त्यावेळी तुतारीकडे असलेला कल, जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झालेली मदत, भीमा पाटस कारखाना कामगार आंदोलन या सर्व बाबींमुळे माजी आमदार रमेश थोरात यांचा विजय होईल असा दावा करत आहेत.
दौंड तालुक्याची एकंदरीत परिस्थिती पाहता राहू बेट आणि दौंड शहर यावरच कुल आणि थोरात यांच्या विजयाची भिस्त कायम राहिलेली दिसत आहे. राहू बेट नंतर कुल यांना यावेळी पिंपळगाव, बोरी ऐन्दी, कासुर्डी, यवत, खोर, देऊळगाव गाडा, नानगाव, बोरिपार्धी, वरवंड, कड़ेठाण, खडकी, रावणगाव, स्वामी चिंचोली आणि आसपाच्या छोट्या मोठ्या गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे तसेच पूर्व भागात राहुल कुल यांचं पारडं जड राहील अशी परिस्थिती दिसत आहे.
तर रमेश थोरात यांना खुटबाव नंतर केडगाव, दापोडी, पाटस, कानगाव, पडवी, हिंगणीगाडा, मलठण, या गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. खामगांव, भांडगाव, कुसेगाव, पारगाव, मळद ही गावे बरोबरीत अथवा शे-दोनशे मतांनी कुल किंवा थोरात यांना मागे पुढे राहण्याची शक्यता आहे.
राहू बेट आणि खुटबाव परिसर – आमदार राहुल कुल यांना राहू बेट परिसरातून साधारण आठ हजारांच्या आसपास लीड राहील अशी शक्यता वर्तवली जात असून माजी आमदार रमेश थोरात यांना खुटबाव परिसरातून साधारण अडीच हजारांच्या आसपास लीड राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत दौंड शहराची बाजू पाहता दौंड शहर हे कायम माजी आमदार रमेश थोरात यांच्याकडे झुकलेले दिसत असायचे मात्र यावेळी विद्यमान आमदार राहुल कुल आणि त्यांच्या समर्थकांनी येथे काटे की टक्कर दिल्याचे पहायला मिळत आहे.
अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कामावर तालुक्याचे लक्ष – विधानसभा निवडणुकीत अजित पवार पक्षाचे विरधवल जगदाळे, महेश भागवत, वैशाली नागवडे, गुरमुख नारंग, मधुकर दोरगे, नितीन दोरगे तसेच शरदचंद्र पवार पक्षाचे अप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, डॉ.खळदकर, डॉ.वंदना मोहिते, दिग्विजय जेधे हे आपापल्या भागातून किती लीड देतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
दौंड तालुक्यात कुल-थोरात दोन्ही गटांनी विजय आपलाच होईन असा दावा केला असून तालुक्यात तुतारीने लोकसभेला २६ हजारांचे लीड घेतले होते त्यामुळे यावेळीही येथे लीड मिळेल असा दावा थोरात समर्थक करत असून कितीही काटे की टक्कर झाली तरी विद्यमान आमदार राहूल कुल हे कमीत कमी ५ हजार आणि जास्तीत जास्त १५ ते २० हजारांनी निवडून येतील असा दावा कुल समर्थकांनी केला आहे.