जिल्हापरिषद निवडणूक विशेष
लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. मात्र कोणतीही निवडणूक असली तरी तेच तेच चेहरे जनतेसमोर येत असल्याने जनतेमध्ये या ठराविक गाव पुढऱ्यांच्या चेहऱ्यांबद्दल कमालीची नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील खदखद ओळखून आतातरी सर्व पक्षातील मोठ्या नेत्यांनी तेच तेच पुढारी नागरिकांच्या माथी मारू नयेत अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता करत आहे.
गेल्या २५ ते ३० वर्षांपासून आजपर्यंत प्रत्येक गावात ठराविक पुढारी सर्वसामान्य जनतेवर आपल्या कुटील डावपेचांनी राज करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एखादा पुढे निघाला की त्याला काटकरस्थानामध्ये अडकवायचा आणि आपणच पुढे होऊन त्याची मदत करत असल्याचा देखावा करायचा म्हणजे चित भी मेरी और पट भी मेरी असा हा सर्व खेळ गावापातळीवर वर्षांनुवर्षे चालत आलेला आहे. जिकडे सत्ता तिकडे आम्ही त्यामुळे तुम्ही काहीही करा पण आम्ही मात्र तुमची इच्छा नसतानाही तुमच्या मानगुटीवर बसून तुमचे पुढारी म्हणवणार असा जणू अघोषित नियमच या गाव पुढाऱ्यांनी केला आहे.
त्यामुळे या सर्व जंजाळतून आता सुटका करुन घेण्यासाठी सर्वसामान्य जनता ही सुशिक्षित उमेदवार शोधत असल्याचे दिसत आहे. ज्यांना लोकांच्या अडचणींची जाण आहे, जे फक्त वरिष्ठ नेत्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या कल्पक बुद्धीने गावाचा आणि त्या विभागाचा विकास करतील, उच्चशिक्षित असल्यामुळे प्रत्येक अडचण कशी दूर करावी आणि प्रत्येक काम हे भ्रष्टाचार मुक्त कसे करावे हे ज्यांना समजते अश्यांना उमेदवार म्हणून पाहण्याची इच्छा सर्वसामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत.
लवकरच जिल्हापरिषद आणि पंचायतसमितीची निवडणूक तारीख जाहिर होणार आहे. येत्या काही दिवसांत जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षणही निघेल त्यामुळे आता तेच तेच चेहरे समोर आणून जनतेला वेठीस धरण्यापेक्षा प्रत्येक पक्ष आणि गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी आतातरी उच्चशिक्षित, होतकरू आणि नव्या दमाच्या तरुणांना संधी देऊन संधीचे सोने करावे अशी अपेक्षा सर्वसामान्य, भोळी भाबडी जनता वरिष्ठ नेत्यांकडून करत आहे.