दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या एका इनोव्हा कार ने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा रस्त्यावर पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे पतीही गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत संतोष पोपट पानसरे (रा.कळस, इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.7 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:00 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे सासरे रमेश केकाण आणि सासू केशर रमेश केकाण हे भिगवणवरून पाटस येथे येत असताना त्यांना इनोव्हा कार नं. टीएस 09 एफ आर 1122 या कार ने भरधाव वेगात येऊन त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेने केकाण पती-पत्नी हे हवेत उडून रस्त्यावर पडून बेशुद्ध झाले. यामध्ये केशर केकाण यांचा मृत्यू झाला.
दुचाकीला धडक दिल्यानंतर भरधाव वेगात असणारी इनोव्हा कार ही जागेवर न थांबता महामार्गाचे कठडे तोडून सेवा रस्त्यावर गेले आणि सेवा रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विजेच्या खांबाला जाऊन जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात होती की विजेचा लोखंडी खांबही मधून वाकला होता. या अपघातावेळी इनोव्हा कारमध्ये पाच जण होते. मात्र त्यातील कुणाला गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली. कुरकुंभ पोलीसांनी या प्रकरणी वाहन चालक योकुब रामोजी बानोथ (रा. वारंगल, तेलंगणा) यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो.हवा.कोळेकर करीत आहेत.