पुणे : पुणे रिंगरोड हा शासनाचा केवळ एक प्रकल्प नसून, तो पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा महामार्ग असल्याचे मत सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख व दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी व्यक्त केले आहे.
सार्वजनिक उपक्रम समितीच्या सर्व सदस्यांनी आमदार ॲड. राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली समिती अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (MSRDC) प्रस्तावित वर्तुळाकार रस्त्याचे (रिंग रोड) रहाटवडे व कल्याण या गावात पश्चिम रिंग रोड कामाची तसेच बोगद्याची प्रत्यक्षात पाहणी करून सविस्तर आढावा घेतला यावेळी ते बोलत होते.
हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी आमदार ॲड. राहुल कुल हे देखील मागचे अनेक वर्षे विधानसभा सभागृहात सातत्याने मागणी करीत होते. यामुळे पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मोठी मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १७२ किलोमीटर लांब आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले असून या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीच्या अडथळ्याची समस्या दूर होणार आहे व संबंधित भागाचा विकास होणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ५५६२३ कोटी रुपये एवढा आहे. वाहतुकीसाठी ३ व ४ अशा प्रकारे लेन उपलब्ध असतील, वाहनांच्या सुरक्षित व जलद वाहतुकीसाठी १२० किलोमीटर प्रतितासाचा वेग अनुमती योग्य असेल. संपूर्ण रस्ता काँक्रीट स्वरूपात बांधण्यात येईल. यामध्ये १६ इंटरचेंजेस, १५ मोठे पूल व १५ लहान पूल, १५ बोगदे ३७ व्हायाडक्ट्स / फ्लायओव्हर, ४ रेल्वे ओव्हरब्रिज यांचा समावेश असून, हा मार्ग एक जिल्हा, सहा तालुके व ८२ गावे व्यापणार आहे.
याठिकाणी सुरु असलेल्या बोगद्याच्या कामासाठीचे आवश्यक ब्लास्टिंगचे प्रात्यक्षिक देखील समितीच्या सदस्यांना दाखविण्यात आले. यावेळी सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य आमदार निलेश राणे, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार रईस शेख, आमदार सुभाष देशमुख, आमदार भीमराव तापकीर आदींसह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.