Pune | पुण्यातील DY पाटीलच्या प्राचार्यांना मारहाण – सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

पुणे | पुणे जिल्ह्यातील आंबी येथे असणाऱ्या डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून समोर आली आहे. महाविद्यालयातील लेडीज टॉयलेट जवळ सीसीटीव्ही कॅमेरे का लावले तसेच या महाविद्यालयात ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना का घेतल्या जातात या आरोपांवरून येथील प्राचार्य अलेक्झांडर यांना मारहाण करण्यात आली आहे.

या मारहाणीत त्यांचे कपडे फाटल्याचेही दिसत आहे. शाळेत घडणारे हे प्रकार थांबवून प्राचार्यांची बदली करावी अशी मागणी पालक वर्गातून केली जात असल्याचेही समजत आहे.
डी वाय पाटील महाविद्यालयात मारहाणीचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून येथील तहसीलदारांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.

हा वाद ख्रिश्चन प्रार्थना आणि लेडीज टॉयलेट जवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याच्या रागातून झाला असल्याचे समजत असून याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.