वनराज आंदेकर यांचा गोळीबारानंतर मृत्यू, नाना पेठेत गोळीबार आणि कोयत्याने झाले वार

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत पाच गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील भर चौकात गोळीबाराचे थरार नाट्य घडले आहे. या हल्ल्यानंतर त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.

आंदेकर यांच्यावर गोळीबार करून आरोपी फारार झाले आहेत. या गोळीबारात वनराज आंदेकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी एका जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या संशयितांमध्ये चार जणांची नावे पुढे येत आहेत.

या घटनेने पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवार भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हल्लेखोर हे एका दुचाकीवरून आले होते. त्यांनी अगोदर वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार केला नंतर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला अशी माहिती मिळत आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना नजीकच्या हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आले होते. हॉस्पिटल बाहेर त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत.

हा हल्ला कट रचून करण्यात आला असून हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी चौकातील लाईट घालवली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी उपाययोजना आखली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर्वत्र दक्षता घेतली जात आहे.