पुणे : महाआवास व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता हे दोन्ही अभियान ग्रामविकासासाठी महत्त्वाची आहेत. स्वच्छ, सुंदर व प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी ग्रामपंचायतीनी महत्त्वाची भूमिका निभवावी व शासनामार्फत लवकरच राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
विभागीत आयुक्त कार्यालयात आयोजित निर्मल वारीचा शुभारंभ तसेच राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास योजनेतील पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर आयुक्त नितीन माने, विजय मुळीक उपस्थित होते.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ग्रामविकास विभागाने आषाढी वारीच्या अनुषंगाने सर्व व्यवस्था उभ्या केल्या आहेत. पंढरपूरला दर्शनासाठी येणारा प्रत्येकजण व्हीआयपी आहे. त्यामुळे आषाढी एकादशी होईपर्यंत सर्व व्हीआयपी दर्शन बंद केले आहेत. सर्व मंदिर परिसर वाहनमुक्त केला आहे. ३ हजार स्वयंसेवकांच्या माध्यमातून पंढरपूर मध्ये उद्या (२२ जून) महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
पुढे बोलताना त्यांनी, ‘सर्वांसाठी घरे’ या केंद्र सरकारच्या योजनेत एका वर्षात ३० लाख घरांना मान्यता मिळाली आहे. त्यासाठी ६५ हजार कोटी रुपयांना मान्यता मिळाली असून याअंतर्गत एका वर्षात ५० टक्के घरे पूर्ण होतील. या योजनेतही ग्रामविकास विभागातील चांगल्या कामाबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
सन २०२३-२४ महाआवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोकृष्ट जिल्हे, तालुके व ग्रामपंचायती तसेच शासकीय जागा उपलब्धता सर्वोकृष्ट कामगिरी करणारे तालुके, वाळू उपलब्धता सर्वोकृष्ट कामगिरी करणारे तालुक्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
सन २०२२-२०२३ राष्ट्र संत तुकडोजी स्वच्छ ग्राम स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या ग्रामपंचायती : शेळकेवाडी (करवीर, कोल्हापूर), बोरगाव (कवठे महाकाल, सांगली), कवठे ( खंडाळा, सातारा )
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२०२३ अंतर्गत विभागस्तरीय विशेष पुरस्कार :
स्व. वसंतराव नाईक पुरस्कार- दरेवाडी (सातारा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- ग्रामपंचायत सांडगेवाडी (सांगली), स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार- गोयेगाव (सोलापूर)
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभिमान २०२३-२४ जिल्हास्तरीय पुरस्कार : ग्रामपंचायत गावडेवाडी (प्रथम- ६ लाख), मांजरी खु. (द्वितीय- ४ लाख), सदोबाची वाडी (तृतीय- ३ लाख रुपये)
विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती – स्व. वसंतराव नाईक पुरस्कार- चिंचोली (जुन्नर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- ग्रामपंचायत टाकवे खु. (मावळ), स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार- मांजरवाडी (जुन्नर)
यावेळी स्वच्छ सर्वेक्षण लोगोचे, पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेली पालखी सोहळा माहिती पुस्तिका तसेच वारी सुविधा व टॉयलेट सुविधा ॲपचे मंत्री गोरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.