पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ‘थेट कर्ज’ पुन्हा सुरू करणार

पुणे : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची व्याज परतावा योजना सुरू करण्यासंदर्भात गुरुवार दिनांक 19 रोजी पिडीसीसी बँक मुख्यालय पुणे येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बँकेचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मराठा महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तुषार शेळके, पिडीसीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपसरव्यवस्थापक संजय शितोळे तसेच यशवंत सेनेचे दौंड तालुकाध्यक्ष निलेश मेमाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रधानमंत्री रोजगारनिर्मिती योजना तसेच मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजना बँकेमार्फत राबविण्या संदर्भात चर्चा झाली. मराठा समाजा सोबत इतर समाजालाही पिडीसीसीच्या विविध योजनांचे फायदे कसे देता येतील यावरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. बँकेची थेट कर्ज प्रकरणे बंद असल्यामुळे वरील योजनांचा लाभ लाभार्थ्यांना घेता येत नव्हता ही तांत्रिक बाब ध्यानात घेऊन थेट कर्ज प्रकरणे सुरू करण्याचे निवेदन महासंघाच्या वतीने देण्यात आले.

पिडीसीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत वरील विषयावर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले. या वेळी जिल्हा बँकेचे शेती विभागप्रमुख जाधव, राऊत उपस्थित होते.