दौंड मध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिसांच्या कृत्याचा जाहीर निषेध, शहरातील विविध पक्ष दलित संघटनांचा निषेधाला पाठिंबा

अख्तर काझी

दौंड : देशाची राजधानी दिल्ली येथील इंद्रलोक (ओखला) भागात असलेल्या मशिदीमध्ये मुस्लिम बांधव शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. त्यापैकी काही जणांना नमाज अदा करण्यासाठी मशिदीमध्ये जागा मिळाली नाही. मशिदिमधील जागे अभावी व वेळेच्या बंधनामुळे त्यांनी रस्त्यावर नमाज अदा केली. रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या या लोकांना एका पोलीस उपनिरीक्षकाने नमाज पठण करतानाच लाथा मारून उठवले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने संपूर्ण देशात या कृत्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसाच्या या दुष्कृत्याचा दौंड मधील मुस्लिम समाजानेही जाहीर निषेध नोंदविला आहे.

या उपनिरीक्षकाला सेवेतून फक्त निलंबित न करता थेट बडतर्फ करावे अशी मागणी यावेळी मुस्लिम बांधवांनी केली आहे. या घटनेच्या निषेधाचे निवेदन दौंड पोलीस प्रशासनाला देण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधव व शहरातील विविध पक्ष व दलित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, दिल्लीतील ओखला या ठिकाणच्या मशिदीमध्ये मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी आले होते. जागे अभावी काही जणांना मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी जागा न मिळाल्यामुळे व नमाजाच्या वेळेच्या बंधनामुळे त्यांना मशिदीच्या बाहेरील रस्त्यावर नमाज अदा करावी लागली. मुस्लिम बांधव नमाज अदा करीत असताना त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व जातिवाचक शिवीगाळ करीत अपमानित केले.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिसातील एक अधिकारी नमाज अदा करणाऱ्या मुस्लिम बांधवांना उघडपणे लाथांनी मारहाण करीत असल्याची चित्रफीत जगभरात व्हायरल होत आहे, यातून काहीतरी मोठे घडविण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोपही केला जात आहे. इतके भयंकर कृत्य होऊनही मुस्लिम समाजाने सदर ठिकाणी संयमाचे दर्शन घडविले आहे याची शासनाने नोंद घ्यावी. मारहाण करणारा संबंधित अधिकारी उच्चशिक्षित असून त्याने केलेल्या या कृत्यामागे समाज विघातक शक्ती असल्याचा संशय येत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ या घटनेचा सखोल तपास करून संबंधित अधिकाऱ्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दि.12 मार्च पासून मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना सुरू होत आहे, या कालावधीमध्ये पोलीस प्रशासनाने देशामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी व समाज विघातक कृत्य करणाऱ्यांना कडक शासन करून आपले कर्तव्य पार पाडावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.