मुंबई : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पुणे शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सभागृहात सुरु असलेल्या चर्चेत सहभाग घेत आमदार राहुल कुल यांनी विविध मुद्दे उपस्थित केले.
यावेळी बोलताना आमदार राहुल म्हणाले कि, पुण्यासाठी अंतर्गत व बाह्य असे दोन रिंग रोड मंजूर करण्यात आले आहेत तसेच पुणे सोलापूर महामार्गावरील हडपसर ते यवत दरम्यान, तसेच पुणे अहिल्यानगर महामार्गावर पुणे ते शिरूर असे उन्नत मार्ग मंजूर करण्यात आले असून त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही, खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान सुमारे २२०० कोटी रुपये खर्चाचा भूमिगत कालवा मंजूर करण्यात आल्यामुळे कालव्याची जागा मोकळी होणार आहे.
त्या जागेची किंमत सुमारे १५००० कोटी रुपये असून त्या जागेचा उपयोग करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने उपयोजना कराव्यात, जे मिसिंग लिंक आहेत त्यासाठी भूसंपदान करून त्याची कामे पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावे तसेच लोंगटर्म प्लानिंग करून पुण्याचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यासाठी सर्व सदस्यांच्या समवेत बैठक घेण्याची यावी अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणल्या कि, पुणे शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांचीही संख्या वाढत असून, प्रादेशिक परिवहन यांच्या अहवालानुसार पुण्यामध्ये एकूण ४० लाख ४२ हजार ६५९ इतकी वाहने रस्त्यावर धावत असतात. पुणे शहराची सन २०५४ पर्यंत होणारी वाढ लक्षात घेऊन वाहतुक सुरळीत व सक्षम करण्यासाठी रिंगरोड, बायपास रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो अशा पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा समावेश केला आहे. लोंगटर्म व शोर्टटर्म वाहतूक आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले असून, निधीसाठीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात ३० ठिकाणी मिसिंग लिंक चे काम हाती घेण्यात येणार असून, त्यातील ५ ठिकाणी जिथे जास्त ट्राफिक होते त्याचे भूसंपादन करण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित कामे करण्यासाठी आवश्यक वॉर रूम महानगरपालिकेत उभारण्यात आली आहे. अंतर्गत व बाह्य असे दोन रिंगरोडची कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील तसेच सर्व सदस्यांनी मागणी केल्याप्रमाणे बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आमदार सुनिल कांबळे, आमदार भिमराव तापकीर, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार विजय शिवतारे यांनी या लक्षवेधी वेळी चर्चेमध्ये सहभाग घेतला.