Political | राज्याचे लोन तालुक्यांपर्यंत पोहोचले ! दौंड राष्ट्रवादी ‛दुभंगली’, मात्र पुढची ‛वाटचाल’ तर अजूनही ‛बिकट’ होऊन बसली.?

अब्बास शेख

कालपर्यंत जे शरद पवार धक्कातंत्राबाबत संपूर्ण देशात परिचित होते त्याच शरद पवारांना त्यांचे पुतणे अजित पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत थेट महायुतीशी हातमिळवणी केली आणि स्वतः उपमुख्यमंत्री आणि इतर आठ जणांना मंत्रिपदाची शपथ दिली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली. मात्र हे एकदिवसात घडणे अशक्य असून याच्या रंगीत तालमीची साधी कुजबुज चांगल्या चांगल्या दिग्गजांनाच काय खुद्द सूत्रांच्या हवाल्याने बातमी करणाऱ्या मिडीयाला आणि त्यांच्या सूत्रांना सुद्धा नसावी हे विशेष म्हणावे लागेल. मात्र या सर्व धक्कातंत्रानंतर आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यात पहायला मिळू शकतो आणि यात अडचणीही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत हेही नाकारून चालणार नाही.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. या राजकीय समिकरणांचे लोन आता राज्यातून थेट तालुक्यांपर्यंत येऊन पोहोचले असून दौंड तालुक्यातही याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. आता दौंड तालुक्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर, या तालुक्यात कुल आणि थोरात असे दोन तुल्यबळ गट आहेत. या दोन्ही गटांमध्ये वर्षानुवर्षे राजकीय संघर्ष होताना पहायला मिळत आला आहे. हे दोन्ही गट अगोदर राष्ट्रवादीत होते मात्र एक दुसऱ्यांसोबत कडीमात्रही न जमल्याने यातील कुल गटाने शेवटी भाजप हा पर्याय निवडून आपला चांगलाच जम बसवला आहे. तर थोरात गट हा अजूनही राष्ट्रवादीत असून यावेळी त्यांनी अजित पवार गट हा पर्याय निवडला आहे.

दौंड तालुक्यात सध्या भाजप चे विद्यमान आमदार राहुल कुल यांची सत्ता आहे तर त्यांच्या विरोधात कायम दंड थोपटून उभे असणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात हे अजित पवारांच्या खास मर्जीतील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. थोरात यांनी नुकताच अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. तर याच दौंडमधून महानंदाच्या माजी अध्यक्ष वैशाली नागवडे, झेडपी सदस्य वीरधवल जगदाळे यांनीही अजित पवारांच्या गटात जाणे पसंत केले आहे. शरद पवार यांच्या गटाला आप्पासाहेब पवार, सोहेल खान, डॉ.वंदना मोहिते या नेतेमंडळींनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कोण, कश्यापद्धतीने लढतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून जर तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला तर विद्यमान आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह त्यांचे हजारो कार्यकर्ते हे एकाच व्यासपीठावर येणार की काय याची मोठी चर्चा सध्या तालुक्यात रंगत आहे. तर दुसरीकडे विधानसभेवेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होताना भाजप आपली दौंडची हक्काची जागा कधीच सोडणार नाही असे राजकीय जाणकारांचे मत असून त्यामुळे आमदार राहुल कुल यांना जर येथे महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर त्यांना माजी आमदार रमेश थोरात हे पाठिंबा देणार का..? की येथे विद्यमान आमदार राहुल कुल विरुद्ध अजित पवार गटाचे माजी आमदार रमेश थोरात विरुद्ध शरद पवार गटाचे आप्पासाहेब पवार अशी लढत होणार याचीही मोठी चर्चा सध्या दौंड तालुक्यात सुरू आहे.

एकंदरीतच सध्याची राजकीय समिकरणांचा विचार करता ही समीकरणे अनेकांच्या डोक्यावरून जाताना दिसत असून राज्याचं सोडा अगोदर आपल्या तालुक्यात मेळ कसा घालणार यावर बोला असे सर्वच गटातील कार्यकर्ते एकदूसऱ्याला प्रश्न करताना दिसत आहेत.