अब्बास शेख
दौंड : खेळाचे खोटे सर्टिफिकेट वापरून राज्य राखीव दलात पोलीस भर्ती झालेल्या एका पोलिसावर दौंडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सुनिल तुळशीराम सरोदे (वय 54 वर्षे व्यवसाय नोकरी, रा.एस.आर.पी.एफ. ग्रुप नं.5 दौंड, एरिया नंबर 2, रूमनंबर 32/1 ता. दौंड जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नप्रशि/377, सुशिल केशवराव वाघमारे (वय 33 वर्शे नेमणुक स्थानिक कंपनी, रा.रा.पोलीस बल गट क्र. 5 दौंड मुळ राहणार पंजाब कॉलणी, तडस ले-आउट वर्धा, ता. जि. वर्धा, सध्या रा. रारापोबल गट क्र. 5 दौंड, ता. दौंड, जि.पुणे) याने दिनांक-02/08/2023 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे या आस्थापने वरील शिपाई भरती मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई हे पद मिळवणे करता ओबीसी खेळाडू या प्रवर्गात त्याच्या नावाचे ‘सेपक टकरा’ या खेळाचे अवैध प्रमाणपत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी पुणे यांचे नावाचे पूर्ण पडताळणी अहवालावर लेटर हेड शिक्के, सही, डुप्लिकेट मारून सशस्त्र पोलीस शिपाई हे पद मिळवण्याच्या लोभापाई सरकारची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्या विरुद्ध फिर्यादीकडून सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद देण्यात आली असून पोलीस नाईक शेख यांनी ही फिर्याद दाखल करून घेतली आहे तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकुळ हे करीत आहेत.
बोगस प्रमाणपत्र वापरून भर्ती होण्यामागे मोठी टोळी असण्याची शक्यता
खरा खेळाडू दिवसरात्र मेहनत करून आपले खेळातील कौशल्य वाढवत राहतो. या कौशल्याच्या जोरावर तो तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जिंकत जाऊन आपले हक्काचे मेडल आणि सर्टिफिकेट मिळवत असतो. मात्र खेळाच्या मैदानात न उतरता मोठी रक्कम घेऊन थेट खेळाचे सर्टिफिकेट लोकांना वाटणाऱ्या काही टोळ्या कार्यरत झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यातूनच मग असले बोगस प्रकरणे बाहेर पडत असून अश्या लोकांची चौकशी केल्यास मोठी टोळी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असा आहे सेपक टकरा खेळाचा प्रकार
तुम्ही आतापर्यंत व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि बॅडमिंटन हे खेळताना पाहिले असतील. सेपक टकरा हा खेळ या तिन्ही खेळांचं मिक्स व्हर्जन आहे. या खेळात व्हॉलीबॉल प्रमाणे मध्ये नेट असते. मात्र बॉल हाताने मारता येत नाही. तुम्हाला पायांचा वापर करून बॉल नेटच्या पलीकडे मारावा लागतो. या खेळात पॉइंट देण्याची पद्धत ही व्हॉलीबॉल सारखीच असते.