दौंड : दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक सात येथे कुसडगाव येथील गट क्रमांक 19 ची पोलीस शिपाई पदाची शारीरिक मैदानी चाचणी सुरू असताना या चाचणीमध्ये एका डमी उमेदवारास आणि परिक्षार्थीला पोलीसांनी पकडले आहे.
प्रकाश बाळू त्रिभुवन (वय 27, रा. नालेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) असे मूळ परिक्षार्थीचे नाव असून त्याने त्याच्या जागी गजानन किसन ठाकूर हा डमी उमेदवार उभा केल्याचे निष्पन्न झाल्याने दौंड पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि. 24/12/2021 रोजी दौंड एस.आर.पी.एफ. गट क्र. 7 येथे सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेचे आवेदन अर्ज चेक केले जात होते. त्यावेळी प्रकाश बाळु त्रिभुवन या परिक्षार्थीचा आवेदन अर्ज फिर्यादी व स.पो. हवा. अजय मोरे, तसेच स.पो.शि. ए.एस.शेंडगे हे तपासत असताना त्याचा फोटो व सही जुळत नसल्याने व त्याचे जागी कोणीतरी दुसराच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी त्यास विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गजानन किसन ठाकुर (रा.नलनी बु. ता.भोकरदन जि. जालना) असे असल्याचे सांगितले व परिक्षार्थी प्रकाश बाळु त्रिभुवन (वय 27 वर्षे रा. नालेगांव ता. वैजापुर जि. औरंगाबाद) याच्या जागेवर मैदाणी चाचणीस डमी बसल्याचे त्याने सांगितले.
त्यामुळे दौंड srpf गट क्र. 7 चे पोलीस निरीक्षक महेंद्र दत्तात्रय कोरे यांनी दौंड पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द फिर्याद दिली आहे. दोन्ही आरोपींना दौंड चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली आहे.