अख्तर काझी
दौंड : दौंड मधील पार्वती नगर परिसरातील हॉटेल कृष्णाई मागे सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नागेश ताटे, विनोद लवटे, बाबू कोळी, शांताराम घोलप, सोन्या खंडागळे, पवार मामा (सर्व राहणार दौंड) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार विशाल जावळे यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांना गुप्त माहिती दाराने खबर दिली की, पार्वती नगर परिसरातील कृष्णाई हॉटेल च्या मागे तीन पत्ती जुगार खेळला जात आहे. दडस यांनी पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्याने, पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता काहींना पोलिसांची चाहूल लागल्याने ते पळून गेले मात्र जुगार खेळणाऱ्या नागेश ताटे, विनोद लवटे, बाबू कोळी, शांताराम घोलप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे पळून जाणाऱ्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे सोन्या खंडागळे व पवार मामा असल्याचे सांगितले. पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून अठराशे रुपयांची रोकड व जुगार साहित्य( पत्ते) जप्त केले आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या आदेशानेच सदरची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल ओमासे, सहाय्यक फौजदार सुभाष डोईफोडे, पोलीस हवालदार विशाल जावळे, पोलीस शिपाई सागर गलांडे यांच्या पथकाने केली.