अख्तर काझी
दौंड : स्थानिक गुन्हे शाखेचे (पुणे ग्रामीण) पोलीस पथक सध्या फॉर्ममध्ये दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच, दौंड -पाटस रोड वरील पेट्रोल पंपाची रक्कम लुटणाऱ्या दरोडेखोरांना त्यांनी अवघ्या काही तासातच जेरबंद केले होते. आज (दि.3 ऑक्टोबर) रोजी या पथकाने यवत पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या जबरी चोरीतील फरार आरोपींना अटक करण्याची कामगिरी बजावली आहे. अशा धाडसी कामगिरीमुळे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस प्रशासनाकडून कौतुक होत आहे.
पकडण्यात आलेल्या आरोपिंमध्ये निलेश गणेश मोरे (रा.खंडोबा नगर, बारामती) व आकाश दत्ता सोनवणे (रा.बारामती) या आरोपिंचा समावेश आहे. अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक दि. 3 ऑक्टोबर रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त घालत असताना यवत पोलीस स्टेशन येथे दाखल जबरी चोरीतील चोरीस गेलेला मोबाईल निलेश गोरे याच्याकडे असून तो त्याच्या साथीदारसह वरवंड येथील पुलाजवळ येणार आहे अशी माहिती त्यांना मिळाली. पोलीस पथकाने त्वरित ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे, या पोलीस पथकाने वरवंड पुलाजवळ सापळा रचला.
त्यावेळी दोन इसम दुचाकीवरून येताना त्यांना दिसले. दुचाकी चालविणारा त्यांना हवा असलेला निलेश गोरेच आहे याची खात्री झाल्याने पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी त्यांची नावे, निलेश गोरे व आकाश दत्ता असल्याचे सांगितले. दोघांची झडती घेतली असता निलेश याच्याकडे MI कंपनीचा मोबाईल मिळाला. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीस गेलेला मोबाईल हाच असल्याची त्यांची खात्री झाल्याने त्यांची आणखीन कसून विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. पुढील कारवाईसाठी दोघांना यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.