दौंड : पुण्यातील एका व्यवसायिकाला ब्लॅकमेल करत 5 कोटींच्या खंडणीची मागणी करून पन्नास लाखांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या दोघा खंडणीखोरांना पुणे पोलिस गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्याच्या परिसरात पाठलाग करून पकडले आहे. पुण्यातील व्यवसायिकाला मोहोळ ला बोलवून त्याकडून करोडोंची खंडणी उकळण्याचा या कथित पत्रकारांचा प्लॅन होता.
मात्र त्या व्यवसाईकासोबत पोलिस असल्याची त्यांना चाहूल लागताच त्या दोघांनी पोलिसांच्या अंगावर गाडीघालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी पिस्तूलातून दोन राऊंड गाडीच्या पाठीमागील चाकावर फायर केले. त्यानंतर मदतीसाठी आलेले पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने दोघा खंडणीखोरांना पकडले. दोघेही खंडणीखोर तोतया पत्रकार असल्याचे समोर आली आहे. गाडी अंगावर घातल्याने एका पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सध्या सर्वत्र बोगस पत्रकारांचे पेव फुटले आहे. आम्ही पत्रकार आहोत हे पहा आमचे प्रेस कार्ड असे म्हणत अनेक कथित बोगस पत्रकार व्यावसायिक आणि नागरिकांची लूट करत असतात. विशेष म्हणजे यांचे चॅनेल हे त्यांनी स्वतःच सुरू करून त्याला कुठलीही शासकीय (RNI, MIB) ची परवानगी घेतलेली नसते मात्र प्रेस आणि मिडीयाच्या अविर्भावात हे महाभाग मिरवत असतात आणि त्यातूनच मग सुरू होतो लोकांना लुटण्याचा व्यवसाय. असाच एक प्रकार आज उघडकीस आला असून बोगस प्रेस चॅनेलच्या बातम्यांची भीती दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सध्या बोगस पत्रकारांचे पेव फुटले असून ना डिग्री, ना अभ्यास, ना चार ओळी लिहिण्याची अक्कल, ना कुठले अधिकृत चॅनेल किंवा पेपर मात्र तरीही काही महाभाग प्रेस चे बोगस आयडी कार्ड तयार करून त्याचा वापर ब्लॅकमेलिंग आणि खंडणीसाठी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने आता अश्या मान्यता न घेता बोगस चॅनेल आणि पोर्टल चालवून प्रेस आयकार्ड वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पत्रकारांचे अधिकृत/अनधिकृत धोरण आखून बोगस चॅनेल्स चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.