केडगाव-वाखारी येथील बिबट्याचे फेक ग्रुप फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध करणाऱ्यांवर पोलीस कारवाईची गरज, नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न

केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव-वाखारी मुख्य रस्त्यावर असणाऱ्या कुबेरपार्क परिसरात  बिबट्या आढळल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. यानंतर त्याच ठिकाणी बिबट्या फिरत असल्याचा फेक व्हिडीओ आणि त्यानंतर तीन ते चार बिबटे या ठिकाणी बसले असल्याचे फेक फोटो व्हायरल करण्यात आले. युवकाने पाठवलेला मुख्य फोटो सोडला तर अन्य व्हिडीओ आणि फोटो AI च्या माध्यमातून बनवून ते व्हायरल करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे या भागातील नागरिकांमध्ये आणि या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं.. मिळत असलेल्या माहितीनुसार केडगाव स्टेशन येथील एक युवक आपल्या चारचाकी वाहनातून पुण्यावरून केडगावकडे येत असताना त्याला वाखारी – केडगाव रस्त्यावर आपल्या चारचाकी वाहनासमोर बिबट्या आल्याचे दिसले. त्यानंतर त्याने आपल्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचा फोटो काढला आणि केडगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांना याची माहिती देऊन त्यांना तो फोटो पाठवला. यानंतर नितीन जगताप यांनी सोशल मिडियावर असलेल्या व्हाट्सअप ग्रुपवर याची माहिती देऊन काळजी घेण्याचे आवाहन केले. यानंतर मात्र काही महाभागांनी AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ची मदत घेऊन व्हिडीओ आणि अनेक फोटो तयार केले त्यामुळे या सर्व प्रकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले मात्र आपण काढलेला फोटो हा खरा असल्याचे त्या युवकाने जगताप यांना सांगितले आणि आपल्या मोबाईलमध्ये तो फोटो दाखवला.

त्यामुळे वाखारी – केडगाव रस्त्यावर बिबट्या दिसल्याचा फोटो खरा असल्याचा दावा त्या युवकाने केला आहे तर त्यानंतर जे अन्य फोटो तयार करुन व्हायरल करण्यात आले ते मात्र फेक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने बिबट्याचे टोळीसह फोटो आणि व्हिडीओ बनवून ते व्हायरल करणाऱ्यांवर पोलीस कारवाईची  मागणी केली जात आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकारावर काय ॲक्शन घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.