अख्तर काझी
दौंड : दौंडकर रेल्वे प्रवाशांची कोणतीच मागणी रेल्वे प्रशासन गांभीर्याने का घेत नाही याचा दौंडकरांना वारंवार अनुभव येत आहे. दौंडहुन पुण्याला जाणारी दु.5 वा.ची डेमु ( शटल) रेल्वे स्थानकातील सर्वात लांबच्या प्लॅटफॉर्म क्र.4 वर थांबवली जाते. पुण्याला जाण्यासाठी दौंड गावातुन येणाऱ्या प्रवाशांना या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागते. लहान मुले, रुग्ण, वृद्ध प्रवाशांचे तर खूपच हाल होतात. त्यामुळे अशा प्रवाशांची हेळसांड थांबवुन सदरची डेमु प्लॅटफॉर्म क्र. 4 वर न थांबविता रेल्वे स्थानकातील इतर 2,3,5,6 या प्लॅटफॉर्मवर थांबवावी अशी मागणी दौंडकरांकडून वारंवार पणे केली जात आहे.
दौंडकरांच्या या मागणीकडे रेल्वे प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते आहे. दु.5 वाजण्याच्या दरम्यान रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 2,3,5,6 वर एखादीच गाडी उभी असते किंवा येणार असते. मात्र तरीही 5 वाजताची डेमु या प्लॅटफॉर्मवर थांबवली जात नाही. या वेळे दरम्यान दौंडहुन नगर कडे जाणारी शटल मात्र प्लॅटफॉर्म क्र. 2वर थांबविली जाते. विशेष म्हणजे या गाडीला दौंडहुन फारच कमी संख्येने प्रवासी असतात. तरी ही शटल प्लॅटफॉर्म क्र. 2 वरूनच सोडली जाते. व ज्या डेमु गाडीला दौंड हून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून सुद्धा या प्रवाशांच्या समस्यांकडे व मागणीकडे मात्र दुर्लक्ष करून 5 वा. ची डेमु प्लॅटफॉर्म क्र. 4 वरून सोडली जाते. ही डेमु स्थानकातील इतर प्लॅटफॉर्मवरून का सोडली जात नाही याचे उत्तरही प्रशासनाकडे नाही.
दु. 5 वा. ची डेमु ही पुण्याहून दौंडला येते , या गाडीला सुद्धा पुण्याहून दौंडला येणाऱ्या प्रवाशांची ही संख्या खूप मोठी आहे. त्या प्रवाशांनाही स्थानकाबाहेर जाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. वेळप्रसंगी काही प्रवासी मोठी पायपीट टाळण्यासाठी धोकादायक अशा शॉर्टकट मार्गाचा पर्याय वापरताना दिसतात. जो त्यांच्या जीवावर बेतणारा असा आहे. अशा सर्व परिस्थितीचा विचार करून दौंड होऊन पुण्याला जाणारी दु.5 वा. ची डेमु, रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्रमांक 2,3,5, किंवा 6 वरून सोडावी अशी मागणी दौंडकर करीत आहेत.