राजकीय – अब्बास शेख
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघ हा संपूर्ण राज्यात गाजू लागला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे शरद पवारांची मुलगी विरुद्ध अजित पवारांची पत्नी अशी लढत येथे होत आहे. मात्र काही काळी शरद पवार अजित पवार यांना मानणारे अनेक प्रमुख नेते आता यांच्या धोरणांना वैतागून एकतर दुसऱ्या पक्षात गेले आहेत किंवा त्यांनी वेगळी चूल मांडली आहे. असेच दौंड तालुक्यातील एक आमदार पुत्र आणि दुसरे मोठा राजकीय वारसा लाभलेले दोन नेते सध्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राजकीय वारसा असणारे ओबीसी बहुजन पार्टीचे महेश भागवत हे ट्रक या चिन्हावर बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. महेश भागवत यांना कै. आमदार काकासाहेब थोरात यांचे पुत्र आणि धनगर समाजाचे आधारस्तंभ आनंद थोरात यांनी जाहीर पाठिंबा देत प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. पवार घराण्याशी अतिशय निकटचे संबंध असणारे आनंद थोरात यांनी हा निर्णय का घेतला याचे उत्तर खुद्द त्यांनीच ‘सहकारनामा’शी बोलताना दिले आहे.
आनंद थोरात यांनी महेश भागवत यांना पाठिंबा देण्याचे आणि पवारांना सोडण्याचे कारण काय असा प्रश्न त्यांना विचारला असता, ज्यावेळी मी बारामती आणि इतर अन्य तालुक्यांचा विकास पाहिला त्यावेळी फक्त बारामती सुधरविण्याचे काम पवारांनी केल्याचे दिसले, मात्र अन्य तालुक्यांना ते विकासापासून कायम वंचित ठेवत आले ही माझ्यासाठी खूपच धक्कादायक बाब होती. आमचा दौंड तालुका असो अथवा बारामती मतदार संघातील अन्य तालुके असोत, त्यांनी बारामती व्यतिरिक्त भरभक्कम, मोठा निधी हा कधी अन्य तालुक्यांना मिळूच दिला नाही. विकास निधी मागायला गेलो, कुठली एखादी गोष्ट खटकत असेल ती सांगायला गेलो तर आमचे तळमळीचे म्हणने ऐकून घेण्याची मानसिकता सुद्धा यांची नसायची हा आलेला अनुभव मनाला चटका लावून जात होता. आपला तालुका आणि अन्य तालुक्यांचा विकास करायचा असेल तर अगोदर यांची साथ सोडून स्वतः भक्कमपणे उभे राहून विकासापासून वंचित जनतेची मोट बांधावी लागेल हा विचार मनात आला आणि त्याच दृष्टीने आम्ही आमचा उमेदवार या लोकसभा निवडणुकीत उतरवला आहे असे आनंद थोरात यांनी यावेळी म्हटले.
महेश भागवत यांना लोकांचा पाठिंबा मिळेल का..? या प्रश्नावर बोलताना त्यांनी, आम्ही फक्त धनगर, माळी यांच्यासाठी मते मागत नसून मराठा, मुस्लिम, धनगर, माळी, दलित, मातंग, बारा बलुतेदार आणि ख्रिश्चन अश्या सर्वच समाज घटकांवर जाणूनबुजून विकासापासून वंचित ठेवण्याचा जो अन्याय वर्षानुवर्षे करण्यात आला आहे त्यासाठी आता आम्ही मैदानात उतरलो आहोत. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी आणि खरा विकास घडवून आणण्यासाठी आम्ही महेश भागवत यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. आम्ही फक्त एकच मेळावा घेतला आणि त्याला इतका मोठा प्रतिसाद मिळाला ज्याची आम्हीसुद्धा कल्पना केली नव्हती. जनतेने महेश भागवत यांना मनापासून स्वीकारले आहे आणि ते महेश भागवत यांना निवडून देण्यासाठी उत्सुक आहेत हे त्यांच्या बोलण्यातून आम्हाला समजत आहे त्यामुळे महेश भागवत यांना सर्व जातीधर्माचे लोक मतदान करतील आणि ते चांगल्या मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
क्रमशा… उर्वरित मुलाखत पुढील अंकात