आरोग्यदुतावर दौंडच्या जनतेने इतिहासातील विक्रमी गर्दी करत विश्वास दाखवला, साहेब काय बोलले यावरून विरोधक बुचकाळ्यात – माऊली ताकवणे

दौंड : मी मागील ४० वर्ष दौंड तालुक्याच्या राजकीय समाजिक जीवनात वावरत असून, आजच्या वरवंड ता. दौंड येथील सभेने सर्व सभांचे विक्रम मोडले आहेत, ही इतिहासातील विक्रमी सभा असून आरोग्यदुतावर दौंडच्या जनतेने इतिहासातील विक्रमी गर्दी करत विश्वास दाखवला आहे असे मत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे क्रीडा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माऊली ताकवणे यांनी व्यक्त केले आहे.

या निवडणुकीचे वैशिष्ट्य हे आहे की, ही निवडणूक तरुणांनी हातात घेतली असून, एक ऐतिहासिक निकाल या निवडणुकीच्या शेवटी पाहायला मिळणार आहे. आमदार राहुल कुल यांच्या कामावर प्रभावित होऊन अनेक गावातील युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून अनेक गावांमध्ये राजकीय प्रक्रियेत कधीही सहभागी न होणारे तरुण या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. आतापर्यंत ज्या ज्या वेळी तरुणांनी निवडणूक हातात घेतली आहे त्या त्या वेळी इतिहास घडला आहे. रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या सभेची आणि या सभेची तुलना त्यांनीच करावी असे देखील ताकवणे म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे कोणतेही व्हिजन नाही, विकासाच्या कोणत्याही मुद्द्यावर ते बोलत नाहीत. फक्त बँकेचे गाऱ्हाणे ते नेहमीच सांगत असतात, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्ज देऊन मोठ्या प्रमाणात व्याज याच बँकेने वसूल केले आहे. व्याज वसुलीत दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा नंबर पहिला लागतो. त्यामुळे त्यांनी बँकेचे गाऱ्हाणे सांगणे बंद करावे. महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्याकडे पुढली ५० वर्षाचे व्हिजन आहे. त्यांनी विकासकामाचा लेखाजोखा मांडला आहे.

शरद पवार यांनी राहूल कुल यांच्यावर कोणतीही टीका केलेली नाही, खासदार सुप्रिया सुळे हे या सभेला उपस्थित राहिल्या नाहीत. शरद पवार यांनी पुणे जिल्हातील अनेक उमेदवारांना थेट पाडा असा शब्द टाकला. परंतु राहुल कुल यांच्या बाबतीत तसे काही स्पष्ट बोलल्याचे दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात असून, आज राहुल कुल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेने त्यामध्ये आणखीनच वाढ झाली असल्याचे माऊली ताकवणे यांनी सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार सध्या कार्यकर्त्यांचे मनोबल टीकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.