राजकीय
दौंड : जनतेने पारंपारिक वारसा हक्काने आलेला उमेदवार निवडून देण्याऐवजी आता कर्तृत्वाची जाणीव असणारा, बारामती लोकसभा मतदार संघ तसेच पुणे जिल्ह्याची भौगोलिक आणि जनतेच्या गरजांची परिपूर्ण माहिती असणारा महेश भागवत यांच्या सारखा अभ्यासू नेता निवडावा असे आवाहन भिमा पाटस कारखान्याचे मा.उपाध्यक्ष आणि धनगर समाजाचे प्रमुख नेते आनंद थोरात यांनी ‘सहकारनामा’शी बोलताना केले आहे. अनेकजण निवडणुका आल्या की आपल्या विविध तालुक्यांमध्ये फेऱ्या वाढवतात. अनेक आश्वासने देतात मात्र निवडणुका संपल्या की थेट पुढील पंचवार्षिकलाच उगवतात. आपण काय आश्वासन दिले होते, ते पूर्ण झाले का हे ते कधीच पाहत नाहीत त्यामुळे अश्या लोकांना आता जनतेने जागा दाखवून देणे गरजेचे असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.
सध्या बारामती लोकसभा मतदार संघामध्ये तिहेरी लढत पहायला मिळत आहे. तसे पाहिले तर या मतदार संघात जवळपास 38 उमेदवार निवडणुकीच्या रींगणात उतरले आहेत मात्र यात सर्वात जास्त काटे की टक्कर ही सुप्रिया सुळे × सुनेत्रा पवार × महेश भागवत अशी पहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे ह्या तुतारी, सुनेत्रा पवार घड्याळ तर महेश भागवत हे ट्रक या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. भागवत यांना ओबीसी बहुजन पार्टीने उमेदवारी दिल्याने त्यांच्यासोबत तळागाळातील ओबीसी, बहुजन लोक हे एकवटल्याचे दिसत आहे. काही उमेदवार मात्र आपल्या समाजाची मते इतरत्र न जाता ती आपल्याला मिळावीत यासाठी उभे राहिलेले दिसत आहेत.
महेश भागवत यांना लोकांनी निवडून का द्यावे याचे उत्तर आनंद थोरात यांनी देताना, दौंड आणि इतर तालुक्यातील जो विकास थांबला आहे त्या विकासाला गती देण्यासाठी महेश भागवत यांना जनतेने निवडून द्यावे. महेश भागवत यांच्या सारखा शांत, सय्यमी, सुसंस्कृत, हुशार, उच्चशिक्षित आणि म्हणणे ऐकून घेणारा आणि समजून घेणाऱ्या नेत्याला आपण मतदान करावे असे आवाहन आनंद थोरात यांनी मतदारांना केले आहे.
आनंद थोरात यांनी पुढे बोलताना, महेश भागवत यांनी पाणी प्रश्नावर कायमच अभ्यासू अश्या योजना मांडल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या योजना किती गरजेच्या होत्या आणि त्या जर त्यावेळीच अमलात आणल्या गेल्या असत्या तर बारामती ग्रामिण, इंदापूर, दौंड आणि पुरंदर हे तालुके कायम दुष्काळाच्या झळा सोसत तहानलेले राहिले नसती हे आता लक्षात येत असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आताही या योजना सत्यात उतरविण्यासाठी महेश भागवत यांना निवडून देने ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.