पवार-फुलवरे सामूहिक हत्याकांड : Big Upadate – अंत्यविधी केलेले मृतदेह ‘शव विच्छेदन’ साठी पुन्हा बाहेर काढले, ‘या’ अधिकाऱ्यांच्या उपस्थितिमध्ये होणार पुन्हा शव विच्छेदन

अब्बास शेख

पुणे / दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीपात्रामध्ये सापडलेल्या सात मृतदेहांपैकी अंत्यविधी केलेले तीन मृतदेह शव विच्छेदनासाठी पुन्हा बाहेर काढण्यात आले आहेत. हे शवविच्छेदन उपविभागीय अधिकारी धस सर तसेच तहसीलदार पाटील सर आणि पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा होणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी धस सर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

गेल्या 5 दिवसांपूर्वी पवार-फुलवरे या सासरे जावयांच्या सात जणांचे कुटुंब सामूहिक हत्याकांडात बळी पडले होते. हे अगोदर सामूहिक आत्महत्या असावी असा कयास लावला जात होता मात्र पोलीस तपासाअंती हे सामूहिक हत्याकांड असल्याचे समोर आले आहे. पवार,फुलवरे दांपत्य आणि त्यांच्या तीन मुलांचे हत्याकांड करून त्यांचे मृतदेह भीमा नदी पात्रात टाकून देण्यात आल्याची कबुली पवार यांच्या चुलत भावांनी पोलिसांना दिली आणि या प्रकरणाने गंभीर वळण घेतले.

यातील अगोदर सापडलेले तीन मृतदेहांचे शव विच्छेदन यवत येथे करण्यात येऊन त्यांचा अंत्यविधी करण्यात आला होता मात्र या प्रकरणाने हत्याकांडाचे गंभीर वळण घेतल्यानंतर मात्र पुन्हा शव विच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या अंतिम शव विच्छेदनाचा अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.