दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
दौंड शहर व परिसरात झालेल्या तुफान पावसामुळे येथील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, विशेषतः दौंड -पाटस( अष्टविनायक मार्ग) रस्त्यावरून तर नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील अपघातांची संख्याही वाढलेली आहे, त्यामुळे नागरिक पाटस- दौंड व्हाया कुरकुंभ असा प्रवास करीत आहेत. परंतु या मार्गावर पाटस येथे टोल नाका असल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. स्थानिकांना सुद्धा पाटस येथील टोल नाक्यावर पैसे भरावे हे लागतात, स्थानिकांना या मार्गावरून दिवसातून 4/5 वेळा ये -जा करावी लागते प्रत्येक वेळी टोलचे पैसे भरणे न परवडणारे आहे. स्थानिक नागरिकांचा टोल बंद करावा म्हणून वेळोवेळी निवेदन दिले आहे परंतु नाक्यावर नेमलेले गुंड प्रवृत्तीचे चे कामगार स्थानिकांशी वाद घालीत असतात. वाद विकोपाला पोहोचून अनर्थ घटना घडू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीने आज स्थानिकांना टोल माफ करावा अशा आशयाचे निवेदन दिले आहे. यावेळी टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. वंचित आघाडीचे अश्विन वाघमारे, बंटी वाघमारे, राहुल नायडू, सुमित सोनवणे तसेच इंदापूर ग्राम पंचायत सदस्य आनंद निरगुडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.