दौंड मध्ये पंचक्रोशीतील पालख्यांचे दौंडकरांकडून उत्साहात स्वागत

अख्तर काझी

दौंड : पंचक्रोशीतील कुरकुंभ ची फिरंगाई माता, पांढरेवाडी, कौठडी, मेरगळवाडी, गिरीम, जिरेगाव, मळद या गावांचे ग्रामदैवत भैरवनाथ, माळवाडी, मसनरवाडी गावाचे ग्रामदैवत म्हसोबा,भोळोबा वाडीचा भोळोबा, येडेवाडी, शिरसूफळ या ग्रामदेवतांच्या पालख्या ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत दौंड शहरात दाखल झाल्या.

शहराच्या परंपरेप्रमाणे गावचे पाटील, माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे व मल्हार जगदाळे यांनी दौंड नगरीच्या वतीने पालख्यांचे स्वागत केले. माजी नगराध्यक्ष योगेश कटारिया यांनी मुस्लिम बांधवांच्या साथीने पालख्यांचे स्वागत करीत भक्तांसाठी फराळ उपलब्ध करून दिला.  आफताब सय्यद, तालीब शेख, भैय्या शेख व बरकत कोल्ड्रिंक्सच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शहरातील मुख्य चौकांमध्ये विविध सामाजिक संघटना, दलित संघटनांच्या वतीने तसेच शिवस्मारक समिती, दौंड मंडप -डेकोरेशन- साऊंड संघटनेच्या वतीने पालखीतील भक्तांना खिचडी व पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले. दौंड नगर परिषदेच्या वतीने ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. दौंड शहराच्या परिसरातील 14 गावांच्या ग्रामदेवतांच्या व दौंडचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या पालखीने हरिनामाच्या जयघोषात विठ्ठल मंदिराला भेट देऊन क्षेम आलिंगन दिले. पारंपारिक वाद्य व विठ्ठल नामाच्या जयघोषाने दौंड शहर दुमदुमले.