देश-विदेश : जम्मू काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. जम्मू काश्मीर मधील जन्नत समजल्या जाणाऱ्या पहलगामच्या बैसरन व्हॅली परिसरात मंगळवारी दुपारी 2:45 वाजता या भयानक हल्ल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये आत्तापार्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाची छुपी शाखा असणाऱ्या द रेझिस्टंट फ्रंट (TRF) म्हणजेच टीआरएफ ने घेतली आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार, पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांची नावे विचारली होती अशी माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी अगोदर उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या शुभम द्विवेदी याला त्याचे नाव विचारले त्यानंतर त्या दहशतवाद्यांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश असून नेपाळ आणि युएईचा प्रत्येकी एक पर्यट आणि स्थानिक दोघांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाची गुप्त शाखा द रेझिस्टंट फ्रंट म्हणजेच टीआरएफ (TRF) ने घेतली असून पर्यटकांवर गोळीबार केल्यानंतर दहशतवादी घनदाट जंगलाच्या दिशेने पळून गेले असल्याची माहिती पर्यटकांनी दिली आहे. पहलगाम हल्ल्यात दोन परदेशी दहशतवादी आणि दोन स्थानिक दहशतवादी सहभागी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सकाळी सौदी अरेबियाचा दोन दिवसांचा दौरा सोडून भारतात परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रात्रीच श्रीनगरला पोहोचले असून ते आज पहलगामला जाऊन तेथे माहिती घेणार आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही अमित शहांशी फोनवरून संवाद साधला आहे. अमेरिका, इराण, रशिया, इटली, युएई, तुर्की आणि इतर देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे.