अख्तर काझी

दौंड : आम्हाला कोणाशी स्पर्धा करावयाची नाही, फक्त दौंड शहराच्या विकासाचा ध्यास हेच आमचे मुख्य लक्ष आहे. शहरातील उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवीत आहोत. राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे नगरपालिकेसाठी आणखीन मोठा निधी आणला जाईल व शहराचा विकास केला जाईल. शहराचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न सुरूच आहे आणि यापुढेही आणखीन तेच प्रयत्न केले जातील. दौंडकर मतदारांनी आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारासह नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांना साथ द्यावी व त्यांना विजयी करावे असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले.
नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी ,भाजपा, आर.पी.आय (आठवले), पी.आर. पी. (कवाडे गट) युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शहरातून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेल्या सभेमध्ये मतदारांशी संवाद साधताना आमदार कुल बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, आरपीआयचे नरेश डाळिंबे, पीआरपीचे अमित सोनवणे तसेच नागरिक संरक्षण मंडळ व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनाली वीर सह तेरा प्रभागातील नगरसेवक उमेदवारांनी आपली ओळख यावेळी करून दिली.
आमदार कूल म्हणाले की, खरे तर ही निवडणूक कशासाठी चालली आहे असे जर मला कोणी विचारले तर, सातत्याने या शहराची जी तुमच्या मनामध्ये खंत आहे की दौंड शहरामध्ये राहिलेली विकास कामे झाली पाहिजेत ती खंत दूर करण्यासाठी आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. नगरपालिकेमध्ये निवडून गेलेल्या आपल्या सहकाऱ्यांना शेवटी केंद्राच्या आणि राज्याच्या सहकार्याची अपेक्षा असते. केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये आपले सरकार आहे, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा एकच उमेदवार असल्यामुळे आपण सगळ्यांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे शहरासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी अडचण नाही.
दौंड नगरपालिकेची स्थिती अशी आहे की उत्पन्न मर्यादित आहे त्यामुळे केंद्राच्या आणि राज्याच्या निधीची आवश्यकता आपल्याला आहे आणि तो आशीर्वाद लाभल्याशिवाय या ठिकाणचे नगरसेवक गतीने काम करू शकत नाहीत, आपल्या भागातील विकास कामे पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे केंद्राच्या आणि राज्याच्या योजना शहरामध्ये आणणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. सर्व सहकारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी समजून घेतले आणि कमी कालावधीमध्ये पॅनेल पूर्ण झाला आहे. शेवटपर्यंत स्पर्धा होती परंतु आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया टप्प्यावर आली आहे.
पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत जे योगदान दिले आहे ते पुढच्या दहा-बारा दिवसांमध्ये देणे अपेक्षित आहे. ज्यांना थांबवावे लागले त्यांच्यासाठी केंद्रामध्ये व राज्यांमध्ये वेगवेगळ्या संधी आहेत, जिल्ह्याच्या पदांवर संधी आहे अगदी स्वीकृत नगरसेवकांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सर्व सहकाऱ्यांना पदांच्या माध्यमातून संधी देण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. कोणावर टीका करण्याचा आमचा उद्देश नाही.
आपण काय केले आणि आपण काय करणार आहोत याच्या माध्यमातून आपल्याला या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. आणि त्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका ही सर्वसामान्य जनतेच्या हिताची आहे, आपण केलेल्या कामाची यादी तुमच्यापर्यंत पोहोचवु, करणाऱ्या कामाचा जाहीरनामा पोहोचवू. समोरच्या मंडळींना एवढेच सांगायचे आहे की तुम्ही काय केले आणि तुम्ही काय करणार आहात हे लोकांसमोर नीटनेटके मांडा. या व्यतिरिक्त आपण निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्या उद्देशाने ही निवडणूक लढवतोय याची भूमिका मांडून वैचारिक पद्धतीने ही निवडणूक पार पाडावी असे आवाहन कुल यांनी केले. राज्य सरकारच्या मदतीने शहरात सुरू असलेल्या विकास कामांची मोठी यादीच कुल यांनी दौंडकरांसमोर मांडली.
प्रेमसुख कटारिया म्हणाले की, पूर्वीचे दौंड शहर आणि आत्ताचे दौंड यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. शहरातील सर्व भागातील रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत आणि याचे श्रेय आमदार राहुल कुल यांचे आहे. नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती एवढी नाही की ही सर्व कामे होतील. परंतु शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन एक व्हीजन नजरेसमोर ठेवून राहुल दादांनी एक वेगळे चित्र निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना प्रचंड यश आले व विकासामध्ये मोठी आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे. पूर्व भागातल्या रस्त्यांसह शहरातील सर्व रस्ते झालेले आहेत. शहरातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेजची कामे सुद्धा सुरू आहेत. विशेषतः शहरामध्ये पाण्याविषयी तक्रार केली जाते. त्याच्यासाठीच्या योजनेचे काम चालू आहे.
त्यासाठी दादांच्या माध्यमातून प्रचंड मोठा निधी प्राप्त झालेला आहे. ही सर्व कामे करत असताना शेवटी पैसा हा महत्त्वाचा घटक आहे आणि तो लागतोच. परंतु पैशाबरोबर बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण शहरासाठी काय करायचे हे देखील व्हिजन असणे फार महत्त्वाचे आहे. शहरात जागा उपलब्ध असताना देखील वेगवेगळ्या माध्यमातून जागा मिळवुन घेऊन त्या ठिकाणी काम करणे तसे सोपे नाही. आपले शहर व्यापलेले आहे. एका बाजूला भीमा नदी आहे मध्ये शहर आहे पुढे गेले की रेल्वे पुन्हा एस आर पी पुन्हा शहर अशा पद्धतीचे विचित्र असणारे आपले गाव असताना देखील त्या ठिकाणचे व्हिजन नजरेसमोर ठेवून काहीतरी करण्याचे उद्दिष्ट दादांनी या ठिकाणी ठेवल्यानंतर शासनाच्या मदतीतून पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा त्यांनी लावला आहे. त्यांच्या बुद्धीचा वापर करून त्यांनी शहरातील क्रीडा संकुलासाठी जागा मिळविली आहे आणि त्यामध्ये नगरपालिकेसाठी नाट्यगृहासाठी सुद्धा जागा उपलब्ध करून दिली आहे असे कटारिया म्हणाले.
नगराध्यक्ष पदाच्या नवख्या उमेदवार मोनाली वीर यांनी केलेले छोटेखानी भाषण व दौंडकरांना मागितलेली साथ दाद मिळवून गेले.







