अख्तर काझी
दौंड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने येथील सद्भावना सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरामध्ये 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दौंड रोटरी ब्लड बँकेने रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली. सद्भावना सामाजिक संस्थेच्या वतीने गेली 24 वर्ष अखंडपणे गांधी जयंती निमित्ताने शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. सद्भावनाचे संस्थापक अध्यक्ष जॉन फिलिप यांचे मित्र जेम्स स्वामी हे सलग चोवीस वर्षे रक्तदान करण्यासाठी पुण्याहून येथे येतात. शिबिराच्या 24 व्या वर्षी जेम्स यांनी पुणे (खराडी) ते दौंड सायकल प्रवास करीत शिबिरामध्ये येऊन रक्तदान करण्याचे कर्तव्य पार पाडले हे यंदाच्या शिबिराचे वैशिष्ट्य ठरले.
मा. नगराध्यक्ष वीरधवल जगदाळे, बादशहा शेख, तसेच डॉ. फीलोमन पवार, फीलीप अँथोनी, अमोल काळे, श्रीनाथ वेताळ, डहाळे सर, रुपेश कटारिया, उमेश जगदाळे, सचिन सोनवणे, पीटर फिलिप यांनी शिबिरास भेट दिली. जॉन फिलिप, मनोज नाईक, सचिन रोडे, फ्रान्सिस डॅनियल, जेरी जोसेफ, चंद्रशेखर कलपनूर, रमेश खुडे यांनी शिबिराचे आयोजन केले. या कार्यक्रमाला सद्भावना रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांचे सहकार्य लाभले.