आरोग्य संपदा
आहारातील भरड धान्यांचा वापर कमी झाल्याने प्रत्येक कुंटूबास विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. रोजच्या आहारात ज्वारी, बाजरी, राळा, नाचणी, राजगिरा यासारख्या भरड धान्यांचा वापर करुन आपल्या आरोग्याची काळजी घेता येऊ शकते. याबाबत श्रीवर्धन येथील उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी मार्गदर्शन केले आहे.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय पुणे व राज्य शासनाचे विविध विभाग तसेच श्रीवर्धन नगरपरिषद यांच्या सहकार्याने श्रीवर्धन येथील समुद्रकिना-यावर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष २०२३ निमित्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीवर्धन येथील समुद्रकिना-यास हजारो पर्यटक भेटी देत असतात. स्थानिक व्यवसायिकांनी भरड धान्यांचे आरोग्यातील महत्व याविषयी प्रचार व प्रसार करुन भरड धान्यांच्या पदार्थांची विक्री तसेच भोजनालयांमध्ये भरड धान्यांचा आहारात समावेश करावा व आपल्या व्यवसायाला बळकटी द्यावी असे शेडगे यांनी सुचविले आहे.
प्रदर्शनानिमित्त राज्य शासनाच्या विविध विभागांच्या वतीने शासनांच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. श्रीवर्धन एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आंगणवाडी कर्मचा-यांनी रोजच्या आहारात भरड धान्याच्या 40 पेक्षा अधिक विविध पाककला पदार्थांचे सादरीकरण करुन पाककलेची सविस्तर माहिती दिली. पंचायत समितीच्या बचत गटांनी भरडधान्यांपासून तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने भरड धान्याचा माहिती कक्ष उभारला आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेतर्फे देखील स्वच्छता प्रचार, सेंद्रिय खत, कापडी पिशव्यांचे मोफत वाटप आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या प्रदर्शनात विविध भरड धान्यांची माहिती, या धान्यांचे आहारातील महत्व, या धान्यांमध्ये असलेली पौष्टीक तत्व, या धान्यांचे उत्पादन, तसेच या धान्यांपासून बनविण्यात आलेले पौष्टीक पदार्थ यांची माहिती प्रदर्शन तसेच एलईडी स्क्रीनच्या माध्यामातून देण्यात येत आहे. या विषयाचा प्रचार करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच या धान्यांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पौष्टीक धान्याचे आहारातील महत्वाविषयी जनतेमध्ये जागृती करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघानी २०२३ हे वर्षे आंतरराष्ट्रीय पौष्टीक भरड धान्य वर्ष म्हणूण साजरे करण्याची घोषणा केली आहे. मानवी शरीराला लागणारे पोषक घटक पुरवणारे अन्न म्हणून या धान्यांकडे बघीतले जाते.
या भरड धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, वरई, कोदो, कुटके, सावा, कूट्टु व राजगीरा या दहा धान्यांचा समावेश होतो. या भरडधान्यांना सुपरफूड म्हटले जाते तर पंतप्रधानांनी याला ‘श्री अन्न’ असे संयुक्तिक नाव दिले आहे.
हे प्रदर्शन दिनांक 21 मे 2023 पर्यंत सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे, या प्रदर्शनास सर्व नागरिक तसेच पर्यटकांनी भेटी द्याव्यात, असे आवाहऩ केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.