अख्तर काझी
दौंड : दौंड- सिद्धटेक अष्टविनायक मार्गावरील नेहरू चौक परिसरात नगरपालिकेच्या वतीने ड्रेनेज पाईप टाकण्याचे काम चालू आहे. या कामासाठीच्या खोदाईमध्ये निघालेला राडारोडा अष्टविनायक राज्यमार्ग रस्त्यावरच टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आणखीनच अरुंद झालेला आहे. हा राडारोडा त्वरीत हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
या रस्त्यावरून छोट्या मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. अष्टविनायक गणपती पैकी एक असलेल्या सिद्धटेक गणपतीच्या दर्शनाला जाण्यासाठी सुद्धा याच मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे मोठ्या प्रवासी वाहनांची वाहतूकही या ठिकाणी जास्त आहे. आणि याच रस्त्यावर टाकलेल्या या राडारोडया मुळे वाहतुकीला अडथळा येत असून, अपघातांची ही शक्यता वाढली आहे.
सध्या हे काम वादात असल्यामुळे रखडले आहे. नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी टाकण्यात येणारे पाईप हे लहान असून याचा पुढे नागरिकांना त्रास होणार असून, ड्रेनेज पाईप तुंबून परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये घाण पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे येथील मा. नगरसेविका प्रणोती चलवादी यांचे म्हणणे आहे. नगरपालिकेने या कामासाठी मोठ्या आकाराचे पाईप वापरावेत जेणेकरून भविष्यात स्थानिकांना त्रास सहन करावा लागणार नाही अशी त्यांची व स्थानिक रहिवाशांची मागणी आहे.
याविषयी नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांना विचारले असता त्यांचे म्हणणे आहे की, या कामाच्या मंजूर प्रस्तावामध्ये ज्या आकाराचे पाईप टाकण्यास सांगितले आहे त्याच आकाराचे पाईप आम्ही टाकत आहोत. या विषयांमध्ये नगरपालिका प्रशासन आणि माजी नगरसेविका व स्थानिक हे सर्वच आपल्या ठिकाणी बरोबर आहेत मात्र काहीतरी योग्य तोडगा काढून, मोठा पाऊस सुरू होण्याआधी व एखादी अप्रिय घटना घडण्याआधी हे काम पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.
रस्त्यावरच टाकलेल्या राडारोडया दोन-तीन छोटे अपघात घडलेले आहेत, काही अपघात होता होता राहिलेले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने सदरील काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्यावरील राडारोडा काढावा अशी मागणी स्थानकांकडून होत आहे.