आता घर बसल्या वारस नोंद, इकरार, मयताचे नाव कमी करता येणार – नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बारामती : ई-हक्क प्रणालीचा वापर करून नागरिकांना वारस नोंद, सात-बारावरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे आदी कामे घरबसल्या करता येणार असल्याने नागरिकांनी या प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.

प्रशासकीय भवन येथे आयोजित ई-हक्क प्रणालीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, निवासी नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, भूमी अभिलेख उपअधीक्षक संजय घोंगडे आदी उपस्थित होते.

श्री. मापारी म्हणाले, ई-हक्क प्रणालीद्वारे केलेले सर्व अर्ज तलाठी यांना ई-फेरफारमध्ये घेऊन रुपांतरीत करता येणार आहेत. ई-हक्क प्रणालीचा वापर करण्यासाठी प्रणालीच्या https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिक, सहकारी संस्था यांना वापरकर्ता म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीनंतर लॉगिन करून अर्जदारांना वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, इकरार नोंदी, मयताची नावे कमी करणे आदी सेवेकरीता ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

या प्रणालीवर नागरिक, सहकारी संस्था ऑनलाइन प्रणालीद्‍वारे घरबसल्या आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे (तलाठी) पाठवता येणार आहे. यामध्ये नागरिक स्वतः अथवा महा ई-सेवा केंद्रातून, सेतू केंद्रातून देखील अर्ज करता येणार आहे.

या प्रणालीच्या वापराने ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडील फेरफार घेण्याचे कामकाज सुलभ होणार असून महसूल प्रशासनाच्या कामकाजामध्ये गतिमानता व पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी यापुढे ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाई पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन मापारी यांनी केले.