दौंड (अख्तर काझी) : दौंड विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज(दि.4) शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण 20 उमेदवारांपैकी 6 उमेदवारांनी आज निवडणुकीतून माघार घेतली.
त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार वीरधवल जगदाळे, वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारी मिळालेले बादशाह शेख तसेच राजाभाऊ तांबे यांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 14 उमेदवारांपैकी तीन उमेदवार, महायुती (भाजपा) चे राहुल सुभाष कुल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रमेश किसन थोरात, बहुजन समाज पार्टीचे योगेश कांबळे हे राष्ट्रीयकृत पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत.
दौंड विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 313 मतदान केंद्र असून,3 लाख 19 हजार 311 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 63 हजार 917 असून 1 लाख 55 हजार 383 महिला मतदार,11 तृतीयपंथीय मतदार आहेत.85 वर्ष वयोगटातील 3848 मतदार आहेत तर 3 हजार 168 दिव्यांग मतदार असून 298 सेवा मतदारांची (सर्विस वोटर्स) संख्या आहे. उमेदवारांची संख्या 14 असल्याने मतदान प्रक्रियेसाठी एकच ईव्हीएम यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. गृह मतदानासाठी 83 मतदारांनी नाव नोंदणी केली असून त्यांच्या मतदानासाठी तालुक्यात दोन पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड म्हणाले की, कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन सज्ज असून जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. निवडणूक प्रक्रियेमधील… मतदानाची तयारी, मतदान, मतमोजणी असे तीन टप्पे आता बाकी आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 29 झोनल ऑफिसर्स कार्यरत आहेत.48 बस व दहा जीप अशी वाहने त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. दि.19 नोव्हेंबर रोजी सर्व मतदान केंद्रासाठी ईव्हीएम यंत्राचे वाटप होणार असून,दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रियेनंतर सर्व ईव्हीएम यंत्रे शहरातील शासकीय गोदामात सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. सर्व निवडणूक प्रक्रिया उमेदवारां समक्ष होणार असून मतदान प्रक्रिये नंतर ईव्हीएम यंत्र ज्या शासकीय गोदामात ठेवण्यात येणार आहे त्या ठिकाणी जर उमेदवारांच्या प्रतिनिधीला थांबावयाचे असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रिया पार पडत असताना एखाद्या मतदान केंद्रावर जर काही चुकीचे होत असेल व त्याची तक्रार मतदाराला जर करावयाची असेल तर त्यासाठी प्रशासनाकडून सी व्हिजल ॲप ची सोय करण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदार तक्रार करू शकतो व त्याची वेळीच दखल घेतली जाणार आहे. मतदारांना प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन गणेश मरकड यांनी केले. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी अरुण शेलार उपस्थित होते.
इतर उमेदवार व त्यांचे चिन्ह
अविनाश मोहिते (संभाजी ब्रिगेड, चिन्ह शिलाई मशीन), रमेश जयसिंग थोरात (राष्ट्रीय मराठा पार्टी, ट्रंपेट) उमेश महादेव म्हेत्रे (स्टुल) जाधव सुरेश भिकू (सीसीटीव्ही कॅमेरा) जितेंद्र कोंडीबा पितळे (इस्त्री) बिरुदेव पापरे (एअर कंडिशन मशीन) रवींद्र कुशाबा जाधव (प्रेशर कुकर) राजेंद्र निवृत्ती म्हस्के (कपाट) शुभांगी धायगुडे (किटली) सागर मासगुडे (खिडकी) संजय कांबळे (गॅस सिलेंडर)