खोटा प्रचार बंद करा | राष्ट्रवादी काँग्रेस (अप) महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्याच पाठीशी,  विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता कार्यकर्त्यांनी राहुल कुल यांचाच प्रचार करावा – विरधवल जगदाळे, वैशाली नागवडे

दौंड : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना विरोधकांकडून (तुतारी कडून) कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी अपप्रचार करण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमचाच प्रचार करीत आहेत असा विरोधकांकडून अपप्रचार पसरविला जात आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे,  गुरुमुख नारंग यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पक्षातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे आणि आम्ही महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांचेच काम करत असून कुणीही विरोधकांच्या अफवेला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्याच पाठीशी उभे राहून त्यांचा जोमाने प्रचार करावा असे म्हणत पत्रकार परिषदेमध्ये वैशाली नागवडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांचा चांगलाच समाचार घेतला. तालुक्यात रमेश थोरात यांचाच जर मोठा गट होता असे सांगितले जाते तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाऊन त्यांचे चिन्ह घेऊन निवडणूक लढविण्याची काय गरज होती? रमेश थोरात यांनी पत्रकारांसमोर येऊन सांगावे की त्यांच्यासाठी अजित पवार यांनी काहीच केले नाही..? ही हिंमत त्यांनी एकदा दाखवावी असे आव्हान वैशाली नागवडे यांनी रमेश थोरात यांना केले.

अजितदादांच्या सूचनेप्रमाणे महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनाच पक्षाचा पाठिंबा आहे. आम्ही सगळेच पदाधिकारी, कार्यकर्ते राहुल कुल यांचेच काम करणार आहोत, हे सांगण्यासाठीच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीच्या दोन घटक पक्षांनी दौंड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु वाटाघाटी मध्ये दौंड ची जागा भाजपाकडे गेली. त्यामुळे महायुतीमध्ये बिघाडी होऊ नये, तसेच कोणत्याही नेत्यांना अडचणीत आणायला नको या भूमिकेतून वीरधवल जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्या दिवसापासूनच आमचा पाठिंबा राहुल कुल यांनाच आहे असेही नागवडे म्हणाल्या.

यावेळी वीरधवल जगदाळे म्हणाले की, राहुल कुल यांना भाजपाने उमेदवारी दिली, मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. परंतु आघाडीची बिघाडी होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या सूचनेनुसार मी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्या दिवशीच जाहीर केले होते की आम्ही सर्व महायुतीचेच काम करणार. विरोधक असे सांगतात की महायुती जरी असली तरी पूर्वी आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे होतो, त्यामुळे हे आमचेच (तुतारी) काम करतील असा अपप्रचार सुरू आहे.परंतु यामध्ये हे काहीही तथ्य नाही.

जी सूचना पक्षाचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे साहेब यांनी दिलेली आहे त्या सूचनेचे तंतोतंत पालन आम्ही करणार आहोत. जो आदेश आम्हाला आला आहे तोच आदेश आम्ही खालच्या कार्यकर्त्यांना सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी राहुल कुल यांच्या प्रचाराला लागलो आहोत. माझा विश्वास आहे, आमच्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केली जाणार आहे. ज्याप्रमाणे लोकसभेला महायुती मधून भाजपा व शिवसेनेने राष्ट्रवादीचे काम केले त्याच प्रकारे आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजपाचे काम करेल असा विश्वास मी व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते राहुल कुल यांच्या प्रचाराला लागलेले आहेत. पक्षात राहून जर कोणी विरोधकांचे काम करताना निदर्शनास आल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

चौफुला येथील बैठकीनंतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस राहुल कुल यांच्या प्रचारात सक्रिय झाली आहे. प्रचाराच्या प्रत्येक दौऱ्यात आम्ही सहभागी असणार आहोत. आपण सर्व महायुती बरोबरच आहोत राहुल कुल यांचे काम एक दिलाने करावयाचे आहे अशा सूचनाही कार्यकर्त्यांना यापूर्वीच करण्यात आल्या आहेत असेही जगदाळे, नागवडे यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला गुरुमुख नारंग, नंदू पवार, अनिल साळवे, निखिल स्वामी, सुहास वाघमारे, आनंद बगाडे आदि उपस्थित होते.