नागरिक संरक्षण मंडळ, मित्र पक्षाचे फ्लेक्स फाडून घड्याळाचे चिन्ह चिटकवले, दौंडमध्ये राजकीय तणाव

अख्तर काझी

दौंड : दौंड नगरपालिकेची निवडणूक अत्यंत शांत वातावरणात चालू असताना शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये काही असामाजिक वृत्तीच्या व्यक्तींनी नागरीक हित संरक्षण मंडळ, भाजपा, आरपीआय (आठवले), पी आर पी (कवाडे) आणि मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवारांचा फ्लेक्स फाडल्याने परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.

पीआरपी कवाडे गटाचे पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अमित सोनवणे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवीत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. कारवाई झाली नाही तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

दौंड पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रभाग क्रमांक सात मधील आघाडीच्या उमेदवारांचा बॅनर फाडून त्याच्यावर इतर पक्षाचे चिन्ह चिकटविण्याचा प्रकार घडला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. प्रभाग क्रमांक सात मधील रमापती नगर येथे काही असामाजिक व बेकायदेशीर प्रवृत्तीच्या व्यक्तींनी नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजपा, आरपीआय, पीआरपी आघाडीच्या उमेदवारांचा बॅनर फाडला व त्या ठिकाणी मुद्दामपणे विरोधी पक्षाचे (घड्याळ) चिन्ह चिकटवण्यात आले आहे.

हा प्रकार अत्यंत निंदनीय व कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा आहे. आणि निवडणूक काळात तणाव निर्माण करणारा असून परिसरात एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नच आहे. अशा प्रकारामुळे स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून शांततेला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तत्काळ तपास करून दोषींवर आवश्यक ती कडक कारवाई करण्यात यावी.

यापुढे अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पाऊले उचलावीत. संबंधितांवर कारवाई न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.