दौंडमध्ये व्यवसायिकाचा खून

दौंड : दौंड शहरामध्ये सध्या क्राईमरेट वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या, बलात्कार, खून असे एकामागोमाग एक घटना उघडकीस येत आहेत. काल रात्री अशीच एक खुनाची घटना उघडकीस आली आहे. दौंड शहरातील बोरावके नगर येथील युवा व्यावसायिक अमोल सुभाष साळुंखे (वय 33,रा. बोरावके नगर दौंड) यांची अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

बोरावके नगर येथील सेवा रस्त्याने लिंगाळी कडे जाणाऱ्या रस्त्यावर सदर खुनाची घटना घडली. अमोल यांच्या पत्नी यांनी दौंड पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत अमोल हा बोरावके नगर येथील आपले दुकान बंद करून दि.10 ऑक्टोबर रोजी रात्री 9 ते 9.30 वा. दरम्यान घरी जात असताना येथील गोरख नगर -लिंगाळी रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करीत त्यांचा खून केला. घटनेची माहिती मिळताच दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. दौंड पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.