Murder | पुण्यात भरदिवसा आंदेकर टोळीकडून युवकाचा खून, ‘बंडू आंदेकर’ याच्यासह 6 जणांना अटक

Crime News

पुणे : पुण्यातील नाना पेठेत एक दुसऱ्याकडे पाहण्याच्या जुन्या वादातून आंदेकर टोळीतील सराईतांनी दोन तरुणांवर हातोडा, स्क्रू ड्रायव्हर आणि इतर शस्त्रांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या खुन प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हल्ल्यानंतर उपचार सुरु असताना तरुणाचा मृत्यू… आंदेकर टोळीने केलेल्या हल्ल्यात निखिल आखाडे (वय २९ रा. आंबेगाव पठार, धनकवडी) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. निखिलचा मित्र अनिकेत दुधभाते (वय २७) हाही जखमी झाला असून दुधभाते याने या खुनाबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय होण्याचा धोका, आरोपिंवर मोक्का लावण्याची मागणी… पुण्यातील नाना पेठेत भर दिवसा हे हत्याकांड घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तरुणाच्या खून प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आण्णा राणोजी आंदेकर (वय ६७, रा. नाना पेठ), कृष्णराज उर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर (वय ३३), तुषार निलंजय वाडेकर (वय २४), स्वराज निलंजय वाडेकर (वय २०), पुराराम दियाराम गुजर, आकाश रामदास खरात, आमीर खान यांना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.