महावितरण बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून ‛वेतन’ नसल्याने ‛काम बंद’ आंदोलन

दौंड : दौंड तालुक्यातील दापोडी, केडगाव महावितरण डिव्हिजनला बाह्यस्रोत विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी असून जोपर्यंत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे वेतन मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
याबाबत सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने कार्यकारी अभियंता केडगाव यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांना दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून मुख्य लाईनवर कर्मचारी काम करत असताना ज्यावेळी अपघात घडतात त्यावेळी त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही उपस्थित केला आहे.
बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांनी कामबंद केल्यास याचा मोठा परिणाम येथील नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर होऊ शकतो. त्यामुळे हे कर्मचारी कामबंद आंदोलन स्थगित होऊन कर्मचारी कामावर रुजू होण्यासाठी महावितरण कंपनीला तातडीने पावले उचलावी लागणार आहेत.