दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी चौफुला ता.दौंड येथे सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात आले.
आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली भाजप, आरपीआय, रयत क्रांती संघटना या पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
राज्यात सध्या कोरोनाचे संकट आलेले आहे, त्यातच शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ न मिळाल्याने या दूध उत्पादक शेतकर्यांचेमोठे नुकसान होत आहे. या आंदोलनावेळी राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान द्यावे तसेच प्रतिलिटर 30 रुपये दर मिळावा ही भाजप आणि मित्र पक्षांची असलेल्या मागणीचे त्यांनी समर्थन केले आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळायला हवा असे निर्णय व्हावे अशी जोरदार मागणी यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी शेतकरी हा अर्थव्यवस्थेतेचा गाभा आहे त्यामुळे त्याचा विचार होणे गरजेचे आहे, राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असून सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळून आणि प्रशासकीय यंत्रणेवर कुठलाही ताण येणार नाही हे लक्षात घेऊन आंदोलन करावे असे आवाहनही केले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध दर वाढीसाठी आज भाजप तर्फे संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पंढरपूर येथे सदाभाऊ खोत तर पुण्यात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. या दोन्ही नेत्यांनी यावेळी राज्यसरकरच्या शेतकरी धोरणांवर सडकून टीका केली आहे.
चौफुला येथे करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये सर्व मित्र पक्षाचे जेष्ठ नेते, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.