दौंड : दौंडमधून एक धक्कादायक घटना समोर येत असून आई आणि मुलीच्या भांडणामध्ये अगोदर तुफान हाणामारी आणि नंतर आई ने मुलीचा खून केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मुलीचे वडील हरीओम श्यौप्रसाद जागिंड (वय-44 वर्षे व्यवसाय नोकरी रा-डिफेन्स कॉलणी रेल्वे कॉर्टर आर. बी-2 रुम नं-407D दौड, ता-दाउ जि-पुणे मुळ रा-गणपत विहार तिजारा फाटक अलवर
राज्य राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी सरीता हरीओम जागिंड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची पत्नी सरीता, मुलगी दिक्षा हीरओम जागिंड (वय- 18 वर्षे,) विजयलक्ष्मी (वय 16 वर्षे) पायल (वय- 14 वर्षे,) अनु (वय 9 वर्षे) असे सहा जणांचे कुटुंब असून फिर्यादी हे दौंड रेल्वेमध्ये पॉईंटस मॅन म्हणुन नोकरी करतात.
काल त्यांची पत्नी सरीता व मुलगी दिक्षा यांच्यामध्ये शाळेत झालेल्या वादावरुन दिक्षा ही आज कोणाशी बोलत नव्हती. दिक्षा ही अचानक सायंकाळी रागाने घराबाहेर निघाली असताना तिला तिची आई सरीता हिने दारातून आत ओढुन घरातील बेडरुममधील बेडवर बसवत दिक्षा हीच्या पोटावर लाथ मारली.
यानंतर दिक्षा हिनेही आईला धक्का दिल्यानंतर तिची आई सरीता हीने चिडून जावुन दिक्षा हिला लाथाबुक्याने मारहाण करु लागली. तेव्हा त्या दोघींची भांडणे सोडविण्यासाठी विजयलक्ष्मी हि दिक्षाची लहान बहीण मध्ये गेली असता तिलाही दोघींच्या भांडणात धक्का लागुन ती बाजुला पडली. यावेळी तिची आई सरीता हीने दिक्षा हीच्या गळ्यावर लाथ मारून तिला बेडवर आडवे पाडुन दोन्ही हाताने गळा दाबला त्यानंतर मात्र दिक्षा हिने कसलीच हालचाल केली नाही ती बेडवर निपचित पडून राहिली.
हि संपूर्ण घटना विजयलक्ष्मी हिने तिचे वडील कामावरून घरी आल्यानंतर त्यांना सांगितली. त्यानंतर फिर्यादी हरिओम यांनी दिक्षा जवळ जावुन तिला आवाज दिला असता ती कसलीही हालचाल करीत नव्हती व तिचे अंग थंड पडले होते त्यावेळेस दिक्षा मयत झाल्याची खात्री त्यांना झाली आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. मुलगी दिक्षा हिच्या खून प्रकरणी तिची आई सरिता हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.