दौंड : राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येक इच्छुक आपापल्या परीने प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकारात दौंड तालुक्यातील दोन पारंपारिक योद्धेही आता रणांगणात उतरले आहेत. मात्र या पारंपारिक योद्ध्यांनी एक दुसऱ्यावर टिका केली की काहीजण आपल्यावर टिका केल्याचे भासवून मुद्दाम या लढाईचा भाग होण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता शहरातील काही लोक हा विषय टिंगल टवाळी मध्ये घेऊन यार बोला दुसरे कु, आन ये क्यू आंगपे ओढाताय अशी प्रचलित निम्मी हिंदी, निम्मी मराठी भाषा वापरून जोर जोरात हसताना दिसत आहेत.
‘वाद विधानसभा उमेदवारांचा अण अंगावर ओढून घेतायत नगरपालिका उमेदवार’ अशी काहीशी परिस्थिती सध्या येथे बनत चालली असल्याने हा तर दुसऱ्याचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन नाचण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया आता शहरातून येऊ लागल्या आहेत. राजकारण म्हटलं की टिका, टिप्पणी आलीच. एकाने टिका केली की त्याला पण उत्तर मिळणारच हे त्रिवार सत्य आहे. पण जर टिका करणाऱ्यांना करू द्या, आपण आपली कामे करू आणि त्यातून उत्तर देऊ असे आवाहन केले तरी सुद्धा ‘मेरेकु बोल्या, मेरेकु बोल्या’ म्हणत आकांडातांडव करणाऱ्यांचा मुख्य उद्देश काय आहे हे उघड होऊ लागले आहे.
नेमकं काय घडलं – काल गुरुवार दि.२४ सप्टेंबर रोजी पिंपळगाव (ता.दौंड) येथे विद्यमान आमदार राहूल कुल यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी आमदार कुल यांनी तालुक्यातील विविध विकासकामांची माहिती देत, काहीजण निवडणुका जवळ आल्या की टिका करायला सुरुवात करतात मात्र ज्यावेळी लोक अडचणीत असतात, त्यांना मदतीची गरज असते त्यावेळी हे टिका करणारे पुढारी नेमके कुठे गायब असतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता आणि निवडणुकांचा सीजन आला की हे सिजन नुसार बाहेर येऊन टिका करू लागतात परंतु जनता सर्व जाणते आणि त्यातून ते योग्य निर्णय घेते त्यामुळे अश्या सिजनेबल पुढाऱ्यांच्या टिकेकडे दुर्लक्ष करा आपण आपल्या कामातून त्यांना उत्तर देऊ असे आवाहन यावेळी आ.कुल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते.
मात्र आमदार कुल यांचे हे विधान काहींनी प्रसिद्धीसाठी स्वतःच्या अंगावर ओढून घेत स्वतःला तालुक्यातील राजकारणात बळंचं ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकारामुळे दौंड शहरात ‘आंग पे ओढके लेताय यानी कुछ तो गडबड है बाबा..! बोललं एकाला झोंबलं दुसऱ्याला’ अशी चर्चा सुरु झाली आहे.