मुंबई : जनाई -शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले कि, पुणे जिल्ह्यातील दौंड पुरंदर आणि बारामती या तिन्ही तालुक्याच्या दृष्टीने जनाई शिरसाई आणि पुरंदर या योजना जिरायत भागासाठी वरदान ठरलेल्या असून त्या गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहेत. तालुक्याच्या जिरायत भागातील पाणी प्रश्नावर आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर अधिवेशन लक्षवेधी ठरले आहे.
दौंड तालुक्यातील ताम्हणवाडी, बोरीऐंदी, बोरीभडक, डाळिंब, भांडगाव, खोर, पडवी, देऊळगाव गाडा, कुसेगाव, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, जिरेगाव व पांढरेवाडी अशी अनेक गावे ही दुष्काळी परिस्थितीचा सामाना करीत आहेत. दौंड तालुक्याच्या उशाशी जनाई शिरसाई व पुरंदर जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत. मात्र या पाण्याचा दौंड कर जनतेला आज पर्यंत निश्चित स्वरूपात फायदा झाला नाही. विधान सभेत आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील गावांना पाण्याच्या संदर्भात मध्ये महत्वपूर्ण विषय हाती घेऊन दुष्काळी गावांना न्याय मिळवून द्यावा ही अशी मागणी आमदार कुल यांनी केली आहे.
जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेची प्रकल्पीय सिंचन क्षमता 13835 हेक्टर असून, पुरंदर उपसा सिंचन योजनेची प्रकल्पीय सिंचन क्षमता ही 25753 हेक्टर इतकी आहे. दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील कायम स्वरूपी दुष्काळी भागातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्याच्या उद्देशाने कोट्यावधी रुपये खर्च करून या दोन्ही सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जनाई शिरसई योजनेसाठी 3.60 टीएमसी तर पुरंदर योजनेसाठी 4 टीएमसी पाणी राखीव करण्यात येऊन देखील पुरेशा प्रमाणात पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा केला जात नाही. योजना सुरु होऊन पूर्ण क्षमतेने चालू नाही, योजनेसाठी करण्यात आलेल्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती असून दौंडच्या दक्षिण भागातील अनेक गावे अध्यापही या पाण्यापासून वंचित राहत असल्याचे विधानसभेत सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
जलसंपदा विभागाने यापूर्वी तयार करून दिलेले पाझर तलाव, लघु पाटबंधारे तलाव यांची संख्या कमी असल्याने त्या गावामधील काही समाविष्ट परंतु भरता न येणारे तलाव, समाविष्ट व भरता येणारे तलाव व नव्याने समाविष्ट करण्याची व तलावांचे फेर सर्व्हेक्षण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. खोर गावाचा डोंबे वाडी तलावात बंद नळीतून पाणी पुरवठा करून पाण्यासाठीचा मोठा संघर्ष या भागातील गावांचा कायम स्वरूपी थांबवावा अशी मागणी यावेळी सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. जनाई शिरसाई व पुरंदर योजना दौंड तालुक्यातील गावांना पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करणे व सिंचन योजनेच्या अडचणी आमदार राहुल कुल यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. व फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली तसेच फेरसर्वेक्षण करताना आवश्यक असेल त्या ठिकाणी सुधारित मान्यता देऊन जनाई शिरसाई पुरंदर योजनेच्या पूर्वेच्या ताम्हणवाडी पासून शेवटच्या जिरेगाव कौठडी पर्यंतची सर्व कामे पूर्ण करून, विशेष बाब म्हणून हे तलाव जोडण्या संदर्भातला निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
यावर पाण्याची उपलब्धता पूर्णपणे तपासून घेऊन, सर्व योजनेचे फेरसर्वेक्षण करण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच याबाबत कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.
मुळशीचे पाणी वळविण्यासाठी करण्यात आलेल्या समितीच्या अहवालाची पडताळणी करून लवकरच पाणी वळविण्याच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल व पुणे शहरातील बंद नळी कॅनॉल बाबत सुमारे अंदाजे येणारा खर्च ८०० कोटीच्या आसपास आहे आणि त्या माध्यमातून वाहतुकीची समस्या सुटेल, जवळपास तीन टीएमसी पाणी वाचेल असा प्राथमिक अहवालात म्हटलेल असून, पाच वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.