दौंड : दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी काल ‘दसरा’ सनानिमित्त कारखान्याचे चेअरमन आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपस्थित सुमारे २०० कामगारांनी आमदार राहुल कुल यांच्या कार्याला आणि विचारांना पाठिंबा देत येणाऱ्या विधानसभेला तन, मन, धनाने तुमच्यासोबत उभे राहू असे जाहीर केले.
काल दसरा सणानिमित्त भीमा पाटस च्या कामगारांनी चेअरमन, आमदार राहुल कुल यांची चौफुला येथील श्री कृष्ण मंगल कार्यालय येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भीमा साखर कामगार संघाचे संचालक रामदास बरकडे यांनी कामगारांच्या वतीने चेअरमन आ.राहुल कुल यांच्या कार्याचा गुणगौरव केला आणि कामगारांच्या काही मागण्याही समोर ठेवल्या, ज्यामध्ये कामगारांचे ग्रेडिशन, ज्या १७ कामगारांचे दिवस कमी भरले त्यांना हंगामी करावे, कॉन्ट्रॅकमध्ये असणाऱ्या ४० च्या आसपास कामगारांची पगार वाढ करावी या मागण्यांचा समावेश होता.
यावेळी चेअरमन आ.राहुल कुल यांनी कामगारांच्या संदर्भातील हे प्रश्न लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन उपस्थित कामगारांना देत, प्रत्येक अडचणीतून मार्ग काढून आपण कारखाना सुरु ठेवला आहे. कारखाना सुरु रहावा आणि यातून ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कामगारांना त्याचा फायदा व्हावा अशी प्रामाणिक भूमिका ठेऊन मी प्रयत्न करत आलो असल्याचे सांगितले.
२००२ साली कारखाना निवडणूक जिंकल्यानंतर मी कारखान्यामध्ये कधी राजकारण केले नाही. कुणी किती चुकीचं वागलं तरी मी मात्र चुकीचं वागलो नाही. निराणी यांना सांगताना, सभासद, कामगार यांना सहकार्य करावे, त्यांना योग्य मोबदला मिळावा असं सांगितलं होतं. कारखाना सभेला पाणी प्रश्न उपस्थित केल्यावर विरोधक टिका करतात मात्र मुबलक पाणी असेल तर ऊस पिकू शकतो आणि तरच तो ऊस कारखान्याला घालता येऊ शकतो त्यामुळे पाणी आहे तर ऊस आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न कारखाना मिटिंगच्या चर्चेत घेतला जातो असे त्यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे संचालक विकास शेलार यांनी बोलताना गेली २३-२४ वर्षे दादांनी कारखाना चालू ठेवला हे सर्वांनी पाहिले. आजूबाजूचे कारखाने खाजगी होत असताना, बंद पडत असताना अडचणीतून मार्ग काढत हा कारखाना सुरु ठेवला. दादांनी पुणे, मुंबई, दिल्ली असे असंख्य दौरे करून पाठपुरावा करत कारखाना पुन्हा सुरु केला.
कारखाना सुरु ठेवायचा म्हटलं की ऊस लागतो, ऊसासाठी पाणी लागते, पाण्यासाठी वीज लागते आणि या सर्व बाबी वेळेवर उपलब्ध होण्यासाठी आमदार चांगला लागतो. त्यामुळे तालुक्याचा आमदार कर्तबगार, कार्यतत्पर असावा आणि आपला आमदार कार्यतत्पर आणि कर्तबगार असल्याने यावेळीही भरघोस मतांनी ते निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी भीमा पाटस चे व्हाईस चेअरमन नामदेवनाना बारवकर, तुकाराम ताकवणे, चंद्रकांत नातू यांसह भीमा पाटस चे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.