Shirur|न्हावरा येथून बेपत्ता झालेल्या मुलाचा झाला ‘खून’, पारगाव येथील नदी पात्रात मित्रानेच केला मित्राचा ‘खून’

शिरूर : न्हावरा येथून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय मुलाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या मित्राने पारगाव (ता. दौंड) येथील नदी पात्रात आणून त्याचा खून केल्याचे आता पोलीस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २४ मे रोजी सायंकाळी ९:१५ च्या सुमारास शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील न्हावरा गावातून नाना ऊर्फ विठ्ठल आण्णा किर्तने (वय १९ वर्षे, रा. न्हावरा कारखाना, ता. शिरूर, जि. पुणे) हा मुलगा घरात कोणास काहीएक न सांगता निघुन गेला असल्याची तक्रार त्याची आई सौ. उषा अण्णा किर्तने (वय ४० वर्षे ) यांनी दिली होती. सदरचा मिसींग मुलगा हा संशयास्पदरित्या निघुन गेला असल्याने सदर मिसींग मुलाचा बारकाईने व शिघ्रगतीने तपास करणेसाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पो.स.ई. गणेश जगदाळे, पो.हवा.जनार्दन शेळके, पो.हवा. राहु मोमीन, पो.हवा. योगेश नागरगोजे यांचे एक पथक तयार केले व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथील पो.स. ई. विक्रम जाधव, पो.स.ई. एकनाथ पाटील, सहा.फौज. गोपीनाथ चव्हाण, पो.हवा. शिवाजी भोते, पो.ना. नाथसाहेब जगताप, पो.कॉ.नितेश थोरात, अशोक शिंदे, आण्णासाहेब कोळेकर, पो.कॉ. राजाराम गायकवाड, पोलीस मित्र दिपक बडे यांचेही पथक तयार करण्यात आले होते.

तयार केलेल्या पथकामार्फत मिसींग मुलाचा शोध घेत असताना यवत पोलीस स्टेशन हद्दीत पारगाव गावक्या हद्दीत असणाऱ्या नदी पात्रात एक पुरूष जातीचे प्रेत मिळून आले होते ते प्रेत हे मिसींग मुलगा नाना ऊर्फ विठ्ठल आण्णा किर्तने याचेच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकामार्फतीने बारकाईने व वेगाने तपास करण्यात येत असताना नाना ऊर्फ विठ्ठल आण्णा किर्तने याचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणावरून त्याचा मित्र बबलु ऊर्फ रवीराज ज्ञानदेव निंबाळकर, (रा. न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे) याने मयत नाना उर्फ विठ्ठल यास शेवटचा कॉल केल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी बबलु ऊर्फ रवीराज ज्ञानदेव निंबाळकर याकडे तपास केला असता त्याने यातील मयतास तो वारंवार पैसे मागत असल्याचे कारणावरून त्यास मोटार सायकलवर बसवून घेऊन जावून मुळा मुठा नदीचे पुलावर नेऊन नदीपात्रात पाण्यात ढकलून देऊन त्याचा खुन केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून खुनाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.