हम सब एक है… कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता ‘मार्गदर्शक सूचनांचे’ पालन करून सण साजरे करा – पोलीस निरीक्षक नारायण पवार

दौंड : दौंड तालुक्यामध्ये विविध सण, यात्रा उरुस साजरे करताना हिंदू मुस्लिम बांधवांची एकी वाखानन्याजोगी आहे. प्रत्येक सण हे दोन्ही समाज मोठ्या उत्साहात आणि एकोप्याने साजरा करताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊन आपल्या सामाजिक एकीला बाधा येईल असे कृत्य कुणी करु नये. जे कुणी सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना कठोर शासन केले जाईल असे प्रतिपादन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी मुस्लिम बांधवांची यवत पोलीस ठाण्यात बैठक बोलावून त्यांना ईद च्या निमित्ताने मार्गदर्शक सूचना देताना केले. यवत पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या साधारण 50 ते 60 मशिदिंचे प्रमुख यावेळी बैठकीला उपस्थित होते.


पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनानंतर यवतचे समीर सय्यद, केडगावचे अब्बास शेख, लियाकत शेख, वरवंडचे शफिक शेख, पारगावचे चाँद मणियार, राहू चे शहाबुद्दीन शेख तसेच उपस्थित मुस्लिम बांधवांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांविषयी व मस्जिदवरील असणाऱ्या भोंग्यांविषयी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांकडून माहिती जाणून घेतली यावेळी पोलीस हवालदार सुजित जगताप, पोह होळकर हे उपस्थित होते.

मुस्लिम बांधवांनी रमजान ईद चा सण हा कुठेही गडबड गोंधळ न होता साजरा केला जाईल असे आश्वस्त केले आणि मस्जिद वरील अधिकृत असलेल्या भोंग्यांच्या आवाजाची पातळी हि न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून आदेशाचा अवमान होणार नाही अशी ग्वाही दिली.