तुतारी की अपक्ष..? माजी आमदार रमेश थोरात यांच्या निवासस्थानी आज कार्यकर्त्यांची बैठक

दौंड : दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांना तुतारी चिन्ह मिळणार की ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. याच संदर्भात थोरात यांच्या खुटबाव येथील निवास्थानी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीमध्ये नेमका कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

माजी आमदार रमेश थोरात यांनी जेष्ठ नेते शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे अण शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र असे असले तरी अजून पर्यंत तरी त्यांनी तुतारी कडून उमेदवारी जाहीर झाल्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते अण ते आणि त्यांचे कार्यकर्ते नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बंद दाराआड नेमकं काय घडलं – दोन दिवसांपूर्वी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आप्पासाहेब पवार यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात भेटायला बोलवले होते. या ठिकाणी बंद दाराआड चर्चा झाली मात्र यावेळी तुम्ही एकत्र या, मिळून काम करा, एकत्र राहून काम केले तर तुम्हाला सोपं जाईल अश्या काहीश्या सूचना प्रदेशाध्यक्षांकडून करण्यात आल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, तुम्ही लोकसभेलाच खरेतर इकडे यायला हवे होते असे थोरातांना सांगितल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नेमकी उमेदवारी कुणाला देणार अण कोण कुणाचं काम करणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच ठेवलं गेलं आहे.

एकंदरीतच आज थोरात यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत तुतारी की अपक्ष यावर चर्चा होऊन नेमका काय निर्णय होतो अण माजी आमदार रमेश थोरात यांचा उमेदवारी अर्ज केव्हा दाखल केला जातो हे आजच्या बैठकीत ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.