जम्मू काश्मीर : दिल्ली बॉम्बस्फोटांनंतर, जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या स्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ही घटना अपघाती होती आणि अधिक अंदाज लावण्याची गरज नाही. जम्मू आणि काश्मीर पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून सॅम्पलिंग दरम्यान स्फोट झाला, ज्यामध्ये या प्रकरणाचा तपास करणारे एसआय इसरारसह नऊ जणांचा मृत्यू झाला असे त्यांनी सांगितले आहे.


डीजीपी नलिन प्रभात यांनी पुढे सांगितले की, जप्त केलेले साहित्य पोलिस स्टेशनमधील एका मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते. एसएफएल टीम सॅम्पलिंग तपासणी करत होती. याचे काही नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. सॅम्पलिंग प्रक्रिया दोन दिवसांपासून सुरू होती. परिस्थितीच्या तात्पुरत्या आणि संवेदनशील स्वरूपामुळे, सॅम्पलिंग प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडली जात होती. दुर्दैवाने, सकाळी ११:२० च्या दरम्यान एक अपघाती चुक झाली ज्यामुळे स्फोट झाला. अन्य कोणताही अंदाज लावणे व्यर्थ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या स्फ़ोटामध्ये पोलिस अधिकाऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यांनी सांगितले की मृतांमध्ये एसआय, एसएफएल टीमचे तीन सदस्य, दोन छायाचित्रकार, दोन महसूल अधिकारी आणि एक शिंपी यांचा समावेश आहे. या अपघातात २७ पोलिस, दोन महसूल अधिकारी आणि तीन नागरिक जखमी झाल्याचे डीजीपी यांनी सांगितले. या भीषण स्फोटात पोलिस स्टेशन आणि आजूबाजूच्या इमारतींचेही नुकसान झाले आहे.







